मुंबई - लॉकडाऊनमध्ये राज्यातील टोल बंद होते. त्यामुळे आपले मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे कारण पुढे करत, राज्यातील 14 टोल कंपन्यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा (एमएसआरडीसी) कडे नुकसान भरपाई मागितली आहे. त्यानुसार एमएसआरडीसीने एक प्रस्ताव तयार करत तो राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. या प्रस्तावानुसार एमएसआरडीसीने पहिल्या टप्प्यात चक्क 173 कोटी रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्याचे ठरवल्याची धक्कादायक माहिती, माहिती अधिकारातून समोर आली. तर राज्याला कॊरोनामुळे मोठा आर्थिक फटका बसला असताना या कंपन्याना नुकसान भरपाई देण्याची गरज काय, असा सवाल आता टोल अभ्यासकांनी उपस्थित केला आहे.
22 मार्चपासून राज्यात लॉकडाऊन सुरू झाले. या काळात अत्यावश्यक सेवेतील वाहतूक वगळता प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद होती. एप्रिलपर्यंत टोलबंदी होती. तर त्यानंतर वाहतूक सुरू झाली, पण वाहतूक कमी असल्याने टोलवसुली कमी झाली असे म्हणत टोल कंपन्यानी नुकसान भरपाईची मागणी केली. दरम्यान केंद्र सरकारने टोल कंपन्यांना नुकसान भरपाई देण्याचे धोरण ठरवले आहे. तर आता एमएसआरडीसीनेही टोल कंपन्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. टोल अभ्यासक विवेक वेलणकर यांनी माहिती अधिकाराअंतर्गत ही माहिती समोर आणली आहे.