मुंबई -जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचे मुंबई हॉटस्पॉट ठरले आहे. मुंबईमध्ये गेल्या ३ ते ४ दिवसात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा कमी झाला होता. मात्र आज पुन्हा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. मुंबईत गेल्या २४ तासात नव्याने १३५ रुग्ण आढळून आले आहेत. तसेच १४ ते १६ एप्रिल दरम्यान खासगी लॅबमध्ये चाचण्या केलेल्या १५४ रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने मुंबईमधील कोरोना रुग्णांचा आकडा २७९८वर पोहोचला आहे.
मुंबईत गेल्या २४ तासात कोरोनाचे नव्याने १३५ रुग्ण आढळून आले आहेत. या कालावधीत ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या सहापैकी ५ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. तर, एकाचा वार्धक्याने मृत्यू झाला आहे. या सहा जणांच्या मृत्यूंमुळे मृतांचा आकडा १३१ वर पोहोचला आहे. गेल्या २४ तासात २९ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत आतापर्यंत ३१० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.