मुंबई- पश्चिम उपनगरातील मालाड येथे भिंत कोसळून २० जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी रात्री मुसळधार पाऊस सुरू असताना ही दुर्घटना घडल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. दुर्घटनेत मोठ्या संख्येने रहिवाशी जखमी झाल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
Live :
- १४ तासानंतर मुलीला बाहेर काढण्यात यश
- एनडीआरएफच्या जवानांनी ढिगाऱ्याखालून एका महिलेचा मृतदेह बाहेर काढला
- मुंबईतील अनेक भागात पाण्याची निचरा होत नसल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती
- पालिका अधिकारी रात्रभर कार्यरत
- मृतांना प्रत्येकी ५ लाखाची मदत देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
- मुख्यमंत्र्यांकडून पालिकेची पाठराखण
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शताब्दी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. यावेळी त्यांच्यासोबत मंत्री योगेश सागरही उपस्थित होते.
- अग्निशमन दलाच्या जवानांना एक महिला आणि लहान मुलगा ढिगाऱ्याखाली आढळली असून त्यांना वाचवण्याचे काम सुरू आहे.
- एनडीआरएफचे पथक श्वान पथकासह दाखल.
- पावसाचा जोर कायम.
- मालाड या दुर्घटनेतील जखमींना मुंबईतील वेगवेगळ्या रुग्णलयांत भरती करण्यात आले आहे.
- ट्रामा केअर रुग्णालय, जोगेश्वरी - ७ मृत्यू, ४ जणांची प्रकृती चिंताजनक
- यातील १५ जखमींना केईएम रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
- शताब्दी रुग्णालय, कांदिवली - ९ मृत्यू, ५२ जखमी
- एम डब्लू रुग्णालय, मालाड - २ मृत्यू
- कुपर रुग्णालय, अंधेरी - २ जखमी
- मृतांचा आकडा वाढला असून आता २० जणांचा मृत्यू, ५२ जण जखमी तर, ४ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
- मुंबई आणि नवी मुंबईत सुट्टी जाहीर, शाळा, महाविद्यालयासंह शासकीय कार्यालयांना सुट्टी, मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत
- मालाड दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दु:ख व्यक्त केलं आहे. "मालाड दुर्घटनेबद्दल दु:खी आहे. दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांचं मी सांत्वन करतो. तर जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, यासाठी प्रार्थना करतो", असे ट्वीट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. तर मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखाची मदतही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे.
मालाड पिंपरी पाडा येथील शिवनेरी शाळेजवळील एक सुरक्षा भिंत सोमवारी रात्री मुसळधार पाऊस सुरू असताना कोसळली. सदर भिंत बाजूला असलेल्या घरांवर कोसळल्याने ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले. या अडकलेल्या लोकांना स्थानिक नागरिकांनी तसेच अग्निशमन दलाने ढिगाऱ्याखालून काढून जवळच्या ट्रामा केअर रुग्णालयात दाखल केले.