मुंबई- लहान मुलांचे रुग्णालय म्हणून परळ येथील वाडिया रुग्णालयाची ओळख आहे. हे रुग्णालय बंद करण्याचा घाट घातला जात आहे. असे असताना आता हे रुग्णालय बंद पडू नये, म्हणून पालिकेकडून आणि राजकीय पक्षांकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याचाच एक भाग महापौरांच्या उपास्थित झालेल्या बैठकीत रुग्णालयाला 13 कोटी रुपयांचा मदत निधी देण्यात आला आहे.
वाडिया रुग्णालयाला महापालिकेकडून 13 कोटींचा निधी परळ येथे केईएम रुग्णालयाजवळ वाडिया ट्रस्टकडून लहान मुलांचे रूग्णालय चालवले जाते. मुंबई महापालिकेकडून या रुग्णालयाला आर्थिक मदतही केली जाते. रुग्णालय ट्रस्टवर महापालिकेतील 4 नगरसेवकांची ट्रस्टी म्हणून नेमणूक केली जाते. लहान मुलांवर चांगले उपचार केले जात असल्याने लहान मुलांना येथे उपचार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भरती केले जाते. मात्र, आता हे रुग्णालय बंद करण्याचा घाट ट्रस्टकडून घातला जात असल्याचा आरोप पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आला.
हेही वाचा - मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली
पालिकेकडून रुग्णालयाला एकूण खर्चापैकी 50 टक्के निधी देण्यात येतो. गेल्या काही महिन्यात पालिकेने निधी दिला नसल्याने ही रक्कम 93 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. ही रक्कम पालिकेने दिली नसल्याने रुग्णालयामधील रुग्णांचे हाल होऊ लागले, कर्मचाऱ्यांचे पगारही देणे मुश्किल झाल्याचे पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणले.
याची गंभीर दखल घेत महापौर किशोरी पेडणेकर यांनी रुग्णालयाला भेट देऊन नेमक्या कोणत्या समस्या आहेत हे जाणून घेतले. आमदार अजय चौधरी यांच्या मागणीनुसार महापौर किशोरी पेडणेकर यांनी पालिका आयुक्त प्रविणसिंग परदेशी, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत थकबाकी असलेल्या 93 कोटी पैकी 13 कोटींचा निधी वाडिया रुग्णालयाला त्वरित देण्याचा निर्णय घेण्यात आला. रुग्णांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, म्हणून रुग्णालय प्रशासन आणि पालिका प्रशासनाने एकत्र बसून तोडगा काढावा, असे निर्देशही महापौरांनी दिले आहेत.
हेही वाचा - दबंग-३ विरोधात हिंदू जनजागृतीचे आंदोलन; आक्षेपार्ह दृष्य हटविण्याची मागणी