मुंबई- दीर्घ लॉकडाऊनमुळे स्थिरावलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी राज्य सरकारने अनलॉक सुरू केले असून आजपासून अत्यावश्यक सेवेसाठी मुंबई उपनगरीय रेल्वे सेवा देखील सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील अर्थचक्र वेगाने फिरवण्याची सुरुवात झाली असून 12 मोठ्या सामंजस्य करारांवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या होणार आहेत.
यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई, उद्योग राज्य मंत्री अदिती तटकरे यांचीही उपस्थिती राहणार आहेत. या सामंजस्य कराराद्वारे अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया, सिंगापूर व भारतातील मोठ्या उद्योगांनी गुंतवणूक करण्यास सहमती दिली असून ते अभियांत्रिकी, वाहन व वाहन घटक, माहिती तंत्रज्ञान, लॉजिस्टिक, रासायनिक, अन्न प्रकिया व इतर क्षेत्रात गुंतवणूक करणार आहेत.
जागतिक स्तरावरील नामांकित उद्योजक, प्रमुख देशांचे राजदूत व देशातील मोहिमा आणि द्विपक्षीय गुंतवणूक संस्था यांच्यासमवेत संध्याकाळी साडेसहा वाजता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विशेष सत्राचे आयोजन केले आहे. थेट परदेशी गुंतवणुकीसाठी शेर्पा म्हणून प्रधान सचिव भूषण गगराणी, उद्योग सचिव वेणुगोपाल रेड्डी आणि राज्याच्या औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पी. अनबलगन हे देखील उपस्थित असणार आहेत.
कोरोना संसर्गाच्या विरोधात अवघे विश्व लढा देत असताना जगभरातील उद्योग व व्यापार ठप्प झाले असल्याने जगाचे अर्थचक्र गर्तेत अडकलेले आहेत. त्याचा राज्यावर देखील विपरित परिणाम झाला असला तरी या टाळेबंदीत महाराष्ट्रात 60 हजारपेक्षा अधिक उद्योग यशस्विरित्या पुन्हा सुरू झाले असून त्यात जवळपास 15 लाख कामगार रुजू झालेले आहेत.