मुंबई- जे. जे. मार्ग पोलीस ठाण्याचे 12 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे. त्यांच्या संपर्कातील 44 पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त संग्रामसिंग निशानदार यांनी दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमी सर्वत्र टाळेबंदी करण्यात आली आहे. या काळात बंदोबस्तासाठी सर्वत्र पोलिसांची नेमणुक करण्यात आली आहे. राज्या ग्रीन, ऑरेंज, रेड, प्रतिबंधीत क्षेत्र सर्वत्र पोलीस पहारा देत लोकांनी बाहेर पडून कोरोनाशी हातमिळवणी करु नये म्हणून प्रयत्न करत आहे.
पण, या काळात संपर्क आल्याने अनेक पोलिसांना कर्तव्य बजावत असताना कोरोनाची लागण होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. ज्या पोलिसांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून येत आहेत, अशा सर्व पोलिसांना तत्काळ वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात येत आहे.
दरम्यान, राज्यभरात 385 पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित आहेत. यात 35 पोलीस अधिकारी असून 350 पोलीस कर्मचारी आहेत. दुर्दैवाने आता पर्यंत मुंबई पोलीस खात्यातील चंद्रकांत पेंदूरकर (वय 56 वर्षे) संदिप सुर्वे (वय 52 वर्षे) व शिवाजी सोनावने (वय 56 वर्षे) या तीघांचा तर आज पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक दिलीप पोपट लोंढे (वय 57 वर्षे) यांचा कोरोनातील लढ्यात मृत्यू झाला.
हेही वाचा -टाळेबंदीची कडक अंमलबजावणी करा, मे अखेरपर्यंत राज्य ग्रीन झोनमध्ये हवे - मुख्यमंत्री ठाकरे