मुंबई- कोरोनाचे सावट दिवसागणिक अधिक गडद होत आहे. अशात शालेय शिक्षण विभागाकडून राज्यातील अकरावीची ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया लवकर उरण्याची घाई शिक्षण विभागाला झाली आहे. मागील वर्षाच्या प्रवेशाचे ऑडिट अद्याप जाहीर न करता आणि दुसरीकडे दहावीचा निकाल लागणे दूर असतानाच, अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत न्यायालयाने दिलेल्या अनेक सूचनांना डावलून, ही प्रवेश प्रकिया पूर्ण करण्यासाठी, अनेक प्रकारचे बदल करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.
यात अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश फेरीनंतर काही जागा शिल्लक राहिल्यास त्या भरण्यासाठी प्रथम येणाऱ्यास प्राध्यान्य देण्याची फेरीही रद्द करण्यात आली आहे. दुसरीकडे मागील वर्षी देण्यात आलेल्या मागील वर्षी सामाजिक, शैक्षणिक मागास प्रवर्गाकरता (एसईबीसी) १६ टक्के जागा आरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. त्या कमी करून हे प्रमाण १२ टक्के इतके करण्यात आले आहे. तर अपंग विद्यार्थ्यांसाठी ३ टक्के जागा राखीव ठेवण्यात येत होत्या. हे प्रमाण आता चार टक्के करण्यात आले आहे. राज्यात यंदाही अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ही मुंबई महानगर परिक्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, अमरावती, नाशिक, औरंगाबाद येथे राबविण्यात येणार आहे. तर उर्वरित ठिकाणी ही प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने राबवली जाणार आहे.
अकरावी प्रवेशासाठी न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार, गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांनी अर्जात दिलेल्या कॉलेजांच्या प्राधान्यक्रमांनुसार नियमित प्रवेश फेऱ्या आयेाजित केल्या जातात. त्यानंतरही अनेक महाविद्यालयांमध्ये राहिलेल्या रिक्त जागांवर गुणवत्तेनुसार प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्वावरील फेऱ्या आणि यानंतरही राहिलेल्या विद्यार्थ्यासाठी विशेष प्रवेश फेऱ्या असे प्रवेश प्रक्रियेचे स्वरूप असते.