मुंबई- कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पालिका प्रशासन गेले वर्षभर प्रयत्न करत आहे. मागील मार्चपासून डिसेंबरपर्यंत अंधेरी मरोळ येथील सेव्हन हिल रुग्णालयात मार्च ते डिसेंबर या ९ महिन्यांच्या कालावधीत दरमहा किमान ७ कोटी रुपये याप्रमाणे ७० कोटी रुपये आणि अतिरिक्त ४९ कोटी रुपये असे एकूण ११९ कोटी रुपये इतका खर्च कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारावर करण्यात आला आहे.
सेव्हन हिल्स रुग्णालयात कोरोनारुग्णांवर उपचारांसाठी ११९ कोटींचा खर्च
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पालिका प्रशासन गेले वर्षभर प्रयत्न करत आहे. सेव्हन हिल रुग्णालयात मार्च ते डिसेंबर या ९ महिन्यांच्या कालावधीत दरमहा किमान ७ कोटी रुपये याप्रमाणे ७० कोटी रुपये आणि अतिरिक्त ४९ कोटी रुपये असे एकूण ११९ कोटी रुपये इतका खर्च कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारावर करण्यात आला आहे.
बेड्सची कमतरता
मुंबई महापालिकेच्या जमिनीवर अंधेरी मरोळ येथे सेव्हन हिल्स हे रुग्णालय आहे. हे रुग्णालय कॅन्सर रुग्णालय म्हणून चालवले जाणार होते. मात्र हा प्रस्ताव बारगळला. खासगी संस्थेला हे रुग्णालय चालवण्यासाठी देण्यात आले. काही वर्षांनी खासगी संस्थेकडून पालिकेने हे रुग्णालय आपल्या ताब्यात घेतले. वाद कोर्टात गेल्याने हे रुग्णालय बंद अवस्थेत होते. मुंबईत मागील वर्षी कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असताना बेड्सची कमतरता भासू लागल्याने पालिकेने या रुग्णालयात सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या. सेव्हन हिल रुग्णालय प्रशासनाने ३०६ बेड्सचे रुग्णालय उभारले होते.
१७,८१३ रुग्णांवर उपचार
मागील वर्षी रुग्णांना बेड्स कमी पडू लागल्याने रुग्णालयात १५०० बेड्सची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यातील ३०० बेड्स हे अतिदक्षता विभागासाठी राखीव ठेवले. गेले वर्षभर या रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. मार्च ते डिसेंबर २०२० या कालावधीत कोरोना बाधित एकूण १७,८१३ रुग्णांना दाखल करून घेत त्यांच्यावर उपचार केले. त्यापैकी १५,९१० रुग्ण बरे झाल्याने त्यांना त्या त्या वेळी घरी पाठविण्यात आले.
असा झाला खर्च
गेल्या मार्च ते डिसेंबर २०२० या कालावधीत पालिकेने रुग्णालयात डॉक्टर, कर्मचारी यांच्या वेतनावर २.५ कोटी रुपये, रुग्णालय प्रचालनावर ( खान - पान, अभियांत्रिकी, सुरक्षा , हाऊसकिपिंग, पेशंट केअर इत्यादी) १.५ कोटी रुपये, प्रशासकीय खर्चावर ( औषधे, साहित्ये,संरक्षक व इतर साधने, पाणी, वीज, फोन, केबल, इंटरनेट, मेडिकल गॅस इत्यादी) ३.५ कोटी रुपये, वैधानिक दायित्व, टीडीएस, पीएफ, पीटी, जीएसटी इत्यादीवर १ कोटी रुपये असे एकूण ८.५ कोटी रुपये दरमहा खर्च असताना पालिकेने दरमहा ७ कोटी रुपये याप्रमाणे ७० कोटी रुपये खर्च केले. तसेच, अतिरिक्त खर्च म्हणून ४८.९६ कोटी रुपये खर्च केले.
हेही वाचा -आता 18 वर्षांवरील सर्वांना मिळणार कोरोना प्रतिबंधक लस, 'या' तारखेपासून होणार लसीकरणास सुरुवात