मुंबई -लोकल ट्रेनला मुंबईची जीवनवाहिनी म्हणतात. मात्र, या लोकल गाड्यांवर साडेसहा वर्षांत दगडफेकीच्या ११८ घटनांमध्ये ११३ प्रवासी जखमी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
लोकलमधून दररोज सुमारे ८० लाखाच्यावर प्रवासी प्रवास करतात. या सर्व प्रवाशांना आपला जीव धोक्यात घालून रेल्वेच्या दारात लटकून प्रवास करावा लागतो. या प्रवाशांना प्रवास करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. कधी कधी समाजातील काही विकृत लोकांकडून लोकलवर दगडफेक केली जाते. या घटनेत अनेक निष्पाप लोक जखमी होतात. २०१३ ते जून २०१९ या कालावधीत मुंबईतील लोकल व मेल गाड्यांवर दगडफेकांच्या ११८ घटनांत ११३ प्रवाशी जखमी झाले आहेत, असे माहिती अधिकार कायद्यातून उघड झाले आहे.
रेल्वे गाड्यांमध्ये एकूण ११८ दगडफेकीच्या घटनांमध्ये ११३ प्रवासी जखमी झाले. मात्र, जीआरपीला केवळ २१ प्रकरणे सोडविण्यात यश आले असून त्यांनी २० आरोपींना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे बहुतेक दगडफेकीच्या घटना मध्य रेल्वे मार्गावर घडल्या आहेत.
कर्जत ते सीएसटी दरम्यान झालेल्या एकूण ८४ दगडफेकीच्या घटनांमध्ये एकूण ८१ प्रवासी जखमी झाले. या प्रकरणी जीआरपीला केवळ १५ प्रकरणे सोडविण्यात यश आले असून १३ आरोपींना अटक करण्यात आले आहे. तसेच हार्बर रेल्वेमार्गावर वडाळा ते पनवेल दरम्यान झालेल्या दगडफेकीच्या २१ घटनांमध्ये १९ प्रवासी जखमी झाले. त्याच वेळी, जीआरपीला केवळ ५ प्रकरणे सोडविण्यात यश आले आहे. या प्रकरणात जीआरपीने ६ आरोपींना अटक केली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरुन पालघर ते चर्चगेट दरम्यान झालेल्या १२ दगडफेकीच्या घटनांमध्ये एकूण १४ प्रवासी जखमी झाले. त्याच वेळी, जीआरपीला फक्त १ प्रकरण सोडविण्यात यश आले आहे. जीआरपीने या प्रकरणात अवघ्या एका आरोपीला अटक करण्यात यश आले आहे.
वर्ष व दगडफेकीत जखमी प्रवाशी
लोकलवर २०१३ मध्ये एकूण १६ दगडफेकीच्या घटना घडल्या. यात एकूण १४ प्रवासी जखमी झाले. याप्रकरणी जीआरपीला फक्त ३ प्रकरणे सोडविण्यात यश आले असून त्यांनी ३ आरोपींना अटक केली.
सन २०१४ मध्ये एकूण २१ दगडफेकीच्या घटना घडल्या. यात २० प्रवासी जखमी झाले. मात्र, या ही प्रकरणात जीआरपीला केवळ ४ प्रकरणे सोडविण्यात यश आले असून जीआरपीने अवघ्या ४ आरोपींना अटक केली.
लोकलवर २०१५ मध्ये एकूण १६ दगडफेकीच्या घटना घडल्या असून यात १६ प्रवासी जखमी झाले. दगडफेकीच्या १६ प्रकरणापैकी प्रकरणी जीआरपीने केवळ १ प्रकरण सोडवले आणि एका आरोपीला अटक केली.
लोकलवर २०१६ मध्ये एकूण १२ दगडफेकीच्या घटना घडल्या. यात ९ प्रवासी जखमी झाले. यावेळी जीआरपीला फक्त एक प्रकरण सोडविण्यात यश आले असून त्यांना अवघ्या एका आरोपींना अटक करण्यात यश आले आहे.
सन २०१७ मध्ये एकूण १५ दगडफेकीच्या घटनांमध्ये १९ प्रवासी जखमी झाले. तसेच जीआरपीला फक्त ४ प्रकरणे सोडविण्यात यश आले. जीआरपीने या प्रकरणात अवघ्या ३ आरोपींना अटक केली.
लोकलवर २०१८ मध्ये दगडफेकीच्या एकूण २७ घटनांमध्ये २७ प्रवासी जखमी झाले. त्याचबरोबर, जीआरपीला केवळ ४ प्रकरणे सोडविण्यात यश आले. यावेळी जीआरपीला अवघ्या ४ आरोपींना अटक करण्यात यश आले.
१ जून २०१९ पर्यंत ११ दगडफेकीच्या घटनांमध्ये एकूण ८ यात्रेकरू जखमी झाले आहेत. त्याचबरोबर, जीआरपीला केवळ ४ प्रकरणे सोडविण्यात यश आले.
जीआरपी रेल्वे ठाण्यानुसार दगडफेक आणि जखमी प्रवाशी
सीएसटी जीआरपीमध्ये दगडफेकीच्या एकूण ७ घटनांमध्ये ७ प्रवासी जखमी झाले. त्याच वेळी, जीआरपीला २ प्रकरणे सोडविण्यात यश आले आहे. या प्रकरणात जीआरपीला अवघ्या एका आरोपीला अटक करण्यात यश आले.