महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अकरावीची प्रवेश प्रक्रिया 17 सप्टेंबरपर्यंत होणार पूर्ण; विद्यार्थांना मिळणार आवडीचे महाविद्यालय - Mumbai University

मुंबईतील अकरावीची प्रवेश प्रक्रिया ही 17 सप्टेंबरपर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक राजेंद्र आहिरे यांनी दिली. तर आतापर्यंत अकरावी ऑनलाइनसाठी तीन फेऱ्यांमध्ये ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली आहे. तसेच उद्या जाहीर होणाऱ्या दहावीच्या पुरवणी परीक्षेत जे विद्यार्थी उत्तीर्ण होतील अथवा ज्यांना एटीकेटीची सवलत मिळालेली असेल त्यांना सुद्धा या प्रवेश फेरीमध्ये आपले प्रवेश घेण्याची मुभा शिक्षण विभागाकडून देण्यात येणार आहे.

मुंबई विद्यापीठ

By

Published : Aug 30, 2019, 6:35 PM IST

मुंबई - मुंबई महानगर क्षेत्रात मागील दोन महिन्यापासून सुरु असलेले अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. येत्या 17 सप्टेंबर पर्यंत ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक राजेंद्र आहिरे यांनी 'ईटीवी भारत'शी बोलताना दिली.

आतापर्यंत अकरावी तीन फेऱ्यांमध्ये ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली आहे. त्यानंतरही अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी राहिले आहेत. तर दुसरीकडे 60 हजारांहून अधिक जागा विविध महाविद्यालयांमध्ये शिल्लक राहिल्या होत्या. त्या जागा भरण्यासाठी शिक्षण विभागाने 31 ऑगस्टपासून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या फेरीचे आयोजन केले आहे. या फेरीच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचे महाविद्यालय हवे आहे, तेथे जागा रिक्त असल्यास प्रवेश घेण्याची मुभा मिळणार आहे. मात्र, त्यापूर्वी विद्यार्थ्यांना आपले यापूर्वी करण्यात असलेले प्रवेश रद्द करून संबंधित महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणे आवश्यक आहे.

तसेच रद्द केलेल्या प्रवेशानंतर एखाद्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही तर त्याची कोणतीही जबाबदारी शिक्षण विभाग घेणार नाही, असे विभागाकडून कळविण्यात आले आहे. दुसरीकडे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य ही प्रवेश फेरी 3 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर या कालावधीमध्ये चालवली जाणार आहे. आतापर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी अकरावीसाठी प्रवेश घेतले नाहीत, अशा विद्यार्थ्यांना या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. तर उद्या जाहीर होणाऱ्या दहावीच्या पुरवणी परीक्षेत जे विद्यार्थी उत्तीर्ण होतील अथवा ज्यांना एटीकेटीची सवलत मिळालेली असेल त्यांना सुद्धा या प्रवेश फेरीमध्ये आपले प्रवेश घेण्याची मुभा शिक्षण विभागाकडून देण्यात येणार आहे.

या प्रवेश फेरीनुसार 7 सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयांमध्ये रिक्त असलेल्या जागांची माहिती शिक्षण उपसंचालकांच्या संकेतस्थळावर उपलब्ध केले जाणार आहे. त्यानंतर 9 सप्टेंबर पर्यंत सकाळी दहा ते पाच या कालावधीदरम्यान विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालय निवडणे आवश्यक आहे. तर त्यानंतर त्यात या महाविद्यालयांमध्ये 9 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर या दरम्यान आपले प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे.

या प्रवेश फेरीच्या दुसऱ्या प्रकारात ज्या विद्यार्थ्यांना 35 टक्के पेक्षा अधिक गुण मिळालेले आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत कुठेही प्रवेश मिळालेला नाही त्यांना 13 सप्टेंबर नंतर प्रवेश घेता येणार आहे. मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेली ही सर्व प्रवेश प्रक्रिया 17 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालणार असल्याची माहिती अहिरे यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details