मुंबई- निवडणूक आयोगाचे मतदार ओळखपत्र नसले, तरी मतदारांना आपली ओळख पटवण्यासाठी आयोगाने अकरा पर्याय दिले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मतदान केंद्रावर आधार कार्डासह अकरा कागदपत्रांच्या आधारे मतदारांना मतदान करता येणार आहे. त्यामुळे मतदारांकडे मतदान कार्ज नसले तरी चिंता करण्याची गरज नाही.
हेही वाचा -माहिममध्ये लोकांना बदल हवा - संदिप देशपांडे
'या' ओळखपत्रांचा करा वापर
मतदाराची ओळख पटवण्यासाठी पासपोर्ट, वाहन चालक परवाना, सरकारी अथवा सार्वजनिक उपक्रमातील कंपन्यांचे कर्मचारी असल्यास छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र, छायाचित्र असलेले बँकांचे/टपाल कार्यालयाचे पासबुक, पॅन कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्ती वेतन दस्तावेज (पीपीओ), खासदार, आमदार, विधानपरिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र, आधार कार्ड यापैकी कोणताही एक पुरावा मतदान केंद्रावर घेऊन जाणे आवश्यक आहे.
हेही वाचा -अभिनेता अतुल कुलकर्णीने पत्नीसह बजावला मतदानाचा हक्क
फ्लॅश बॅक - Maharashtra Assembly Election 2019
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. विधानसभेच्या २८८ जागा, तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल. आज राज्यातील तब्बल ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.
राज्यात ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदार - 4 कोटी 68 लाख 75 हजार, 750, महिला मतदार - 4 कोटी 28 लाख 43 हजार 635, तृतीयपंथी मतदार- 2 हजार 634 आहेत, दिव्यांग मतदार - 3 लाख 96 हजार आहेत, सर्व्हिस मतदार- 1 लाख 17 हजार 581 आहेत.
या निवडणुकीसाठी राज्यभरात तब्बल 96 हजार 661 मतदान केंद्रे आहेत. या केंद्रांवर 1 लाख 79 हजार 895 मतदान यंत्र आणि 1 लाख 26 हजार 505 नियंत्रण युनिट तर सुमारे एक लाख 35 हजार 21 व्हीव्हीपॅट यंत्रे पुरवण्यात आली. त्यात राखीव यंत्रांचा देखील समावेश आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व शांततेत, निर्भयपणे व पारदर्शीपणे निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे.