मुंबई - कोरोनाच्या लढाईत आयुष डॉक्टरही सहभागी झाले आहेत. मात्र, या डॉक्टरांना पीपीई किट आणि इतर सुविधा मिळत नसल्याने त्यांना कोरोनाचा संसर्ग होताना दिसत आहे. आतापर्यंत मुंबईत 24 आयुष डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, यातील 11 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता या डॉक्टरांनाही मोफत पीपीई किट मिळावेत आणि 50 लाखांचा आरोग्य विमा जाहीर करावा, अशी मागणी या डॉक्टरांनी लावून धरली आहे.
धक्कादायक! आतापर्यंत मुंबईतील 11 आयुष डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू आयुर्वेदिक-होमिओपॅथी आणि युनानी, असे डॉक्टरही सध्या मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना रुग्णांवर उपचार करत आहेत. त्यातही ग्रामीण भागात आणि मुंबईतील मानखुर्द, गोवंडी, मालवणी अशा झोपडपट्टी भागात आयुष डॉक्टर मोठ्या संख्येने काम करत आहेत. अशावेळी त्यांना संसर्ग होण्याचा धोका असतानाही सरकारकडून त्यांना मोफत पीपीई किट आणि इतर सुरक्षेच्या सुविधा उपलब्ध होताना दिसत नाहीत. मात्र, अनेक डॉक्टर आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यावेळी त्यांना कोरोनाची लागण होत असल्याची माहिती नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनचे (निमा) अध्यक्ष डॉ. संजय लोंढे यांनी दिली आहे. ही असोसिएशन आयुर्वेदिक-युनानी डॉक्टरांसाठी काम करते.
डॉ. लोंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत आतापर्यंत 24 आयुष डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातील या 11 डॉक्टरांचा मृत्यू झाला असून उर्वरित डॉक्टर कोरोनामुक्त झाले आहेत. मानखुर्द, गोवंडी, वडाळा, चेंबूर, मालवणी अशा भागात हे डॉक्टर काम करत होते, तर पुण्यात एका आयुष डॉक्टरचा कोरोनाने बळी घेतला आहे. ही आकडेवारी गेल्या आठवड्यापर्यंतची असल्याचेही डॉ. लोंढे यांनी सांगितले आहे.
सरकारने सर्व सरकारी डॉक्टरांपासून अगदी सरपंचापर्यंत 50 लाखांचा आरोग्य विमा लागू केला आहे. आरोग्य क्षेत्रात काम न करणाऱ्यांना विमा लागू होतो. पण, जे खासगी आणि आयुष डॉक्टर प्रत्यक्ष कोरोना रुग्णांवर उपचार करतात त्यांना मात्र विमा नाही, असे म्हणत डॉ. लोंढे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळेच या डॉक्टरांना मोफत पीपीई किट आणि 50 लाखांचा विमा देण्याची मागणी त्यांनी केली आहे. महत्वाचे म्हणजे डॉ. लोंढे हे राज्याच्या आयुष टास्क फोर्सचे सदस्य आहेत. त्यांनी यासंबंधीची शिफारस राज्य सरकारकडे केली आहे, सरकार नक्कीच याला सकारात्मक प्रतिसाद देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.