महाराष्ट्र

maharashtra

तांत्रिक व्यवस्था शक्य नसल्याने दहावी-बारावीची परीक्षा ऑफलाईनच - वर्षा गायकवाड

By

Published : Mar 5, 2021, 3:31 PM IST

Updated : Mar 5, 2021, 4:42 PM IST

तांत्रिक व्यवस्था करणे शक्य नसल्याने दहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाईनच घेणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत सांगितले. कोरोना रुग्ण असलेल्या विद्यार्थ्यांनादेखील परीक्षा देता येईल, यासाठी व्यवस्था करणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

10th 12th exams latest news
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड न्यूज

मुंबई - तांत्रिक व्यवस्था करणे शक्य नसल्याने दहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाईनच घेणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत सांगितले. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षा कशा होणार, असा प्रश्न उपस्थित केला होता. यावर सभागृहात उत्तर देताना वर्षा गायकवाड यांनी परीक्षा ऑफलाईनच होणार असे सांगितले.

'मागचे वर्ष अडचणीचे गेले. आता पुढच्या वर्षी विद्यार्थ्यांना अडचणी येऊ नये, म्हणून आम्ही गांभीर्याने घेणार आहोत. तसेच, कोरोनाचे नियम परीक्षेत पाळले जातील. विद्यार्थ्यांना सोयीस्कर होईल, अशी व्यवस्था केली जाईल,' असे शिक्षणमंत्री गायकवाड म्हणाल्या. कोरोना रुग्ण असलेल्या विद्यार्थ्यांनादेखील परीक्षा देता येईल, यासाठी व्यवस्था करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईनच

दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा ऑफ लाईन घेतल्या जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत दिली आहे. ऑन लाईन परीक्षेसाठी शासनाकाकडे तांत्रिक व्यवस्था नसल्याने ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार नाही. कोरोना काळामुळे विद्यार्थ्यांचे मागचे वर्ष अडचणीचे गेले. त्यामुळे पुढच्या वर्षी विद्यार्थ्यांना अडचणी येऊ नये, याचा देखील अभ्यास सुरू आहे. विद्यार्थाना भविष्यात त्या अडचणी येऊ नये, म्हणून शासनाकडून उपायोजना करण्यात येणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.

कोरोनाचे नियम पाळून परीक्षा घेणार

कोरोना पुन्हा एकदा डोके वर काढत आहे. ग्रामीण आणि शहरी भागात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे कोरोनाचे सर्व नियम पाळून परीक्षा घेण्याचे आश्वासन वर्षा गायकवाड यांनी दिली. तसेच परीक्षा केंद्र सॅनिटाजेशन करण्यात येणार असून विद्यार्थ्यांमध्ये सोशल डिस्टनसिंग ठेवण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाली असेल आणि तो परीक्षा देण्यासाठी तयार असेल तर, त्यासाठीदेखील व्यवस्था करण्याची तयारी शासनाकडून करण्यात येणार आल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

दहावी-बारावी परीक्षांविषयी विद्यार्थी-पालकांमध्ये आतापर्यंत संभ्रम

राज्य शिक्षण मंडळाची दहावीची लेखी परीक्षा ही २९ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत घेतली जाणार असून हा निकाल ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जाणार आहे. तर, बारावीची लेखी परीक्षा ही २३ एप्रिल ते २९ मे या कालावधीत घेतली जाणार असून बारावीच्या परीक्षेचा निकाल हा जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जाणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी जानेवारी महिन्यात दिली होती. दहावीच्या लेखी परीक्षांपूर्वी प्रात्यक्षिक परीक्षा या ९ ते २८ एप्रिल या दरम्यान, तर बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा या १ ते २२ एप्रिल दरम्यान घेतल्या जाणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली होती. मात्र, परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये आतापर्यंत संभ्रम होता. याबाबत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत प्रश्न विचारला होता.

Last Updated : Mar 5, 2021, 4:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details