मुंबई :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' या कार्यक्रमाचे येत्या रविवारी 30 तारखेला 100 भाग पूर्ण होत आहेत. नरेंद्र मोदी हे 'मन की बात' कार्यक्रमाच्या माध्यमातून मागील 9 वर्षापासून महिन्याच्या शेवटच्या रविवारी रेडिओवरून जनतेशी थेट संवाद साधत आहेत. या विशेष कार्यक्रमाच्या 100 व्या भागाचे येत्या 30 एप्रिल रोजी देशभर प्रसारण होणार आहे. या निमित्ताने मन की बात कार्यक्रम देशात तसेच मुंबईत मोठ्या स्तरावर पाहण्यात व ऐकण्यात यावा यासाठी भाजपकडून जय्यत तयारी केली गेली आहे.
जनतेच्या समस्या जाणून घेतल्या जातात :पंतप्रधान नरेंद्र मोदी 'मन की बात'च्या या रेडिओ कार्यक्रमातून जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या या मन की बात कार्यक्रमाच्या 100 व्या भागाचे देशभरात प्रसारण करण्यासाठी मोठे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला ऐतिहासिक आणि विशेष करण्याची जोरदार तयारी भाजपकडून सुरू आहे. भाजपने या कार्यक्रमासाठी देशभरात एक लाख ठिकाणी विशेष आयोजनं केली आहे. या कार्यक्रमाला सर्व केंद्रीय मंत्री, वरिष्ठ नेते, खासदार, आमदार व नेत्यांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
'मन की बात' चा परिणाम :या कार्यक्रमासाठीदेशभरातून विशेष आणि उल्लेखनीय काम करणाऱ्या 100 जणांना बोलविण्यात आले आहे. या विशेष कार्यक्रमासाठी राज्यातून 9 जणांची निवड करण्यात आली असून त्यांना विशेष आमंत्रण देण्यात आले आहे. यावेळी क्रीडा, चित्रपट, पर्यावरण, जल संरक्षण, महिला उत्थानाशी संबंधित विविध क्षेत्रांतील मान्यवर भव्य समारंभात सहभागी होऊन 'मन की बात'चा देशावर किती परिणाम झाला आहे, हे सांगणार आहेत. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मन की बात चे 100 भाग पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 100 रुपयांचे विशेष नाणेही जारी करणार आहेत. तसेच केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून एक विशेष टपाल तिकीट जारी करण्यात येणार आहे.