मुंबई:बेटिंगसाठी मोबाइल एप्लिकेशन पुरवणाऱ्या सट्टेबाज सुशील अशोक अग्रवाल ऊर्फ सुशील भाईंदरला गुन्हे शाखेच्या पथकाने नुकतीच अटक केली. बुकी अलीकडच्या काळात पोलिसांना चकवा देण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे. मोबाइल ॲप्लिकेशनसह बुकींना संपर्क साधण्यासाठी नवीन टेक्नॉलॉजी आणि व्यवहारांसाठी बिटकॉइनसारख्या बेकायदेशीर चलनाचाही वापर होऊ लागला असल्याची माहिती मिळत आहे.
कराची कनेक्शन: सध्या सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट मॅचसाठी मोठ्या प्रमाणावर लाखोंचे सट्टे लावले जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. सट्ट्यातून मिळालेले पैसे हवालामार्फत नातेवाईकांकडून किंवा एजंट मार्फत कराचीला पाठवले जातात. त्याचप्रमाणे 'डी' गॅंगच्या सांगण्यावरून मुंबईत मोठ्या प्रमाणावर सट्टा लावला जात असल्याची माहिती देखील सूत्राने दिली; मात्र अत्याधुनिक साधनांचा वापर केला जात असल्यामुळे पोलिसांना या सट्टेबाजांपर्यंत पोहोचणे कठीण झाले आहे.
सट्टेबाजही झाले स्मार्ट: एखाद्या मॅचवर सट्टा खुला करण्याआधी सट्टेबाज आणि त्यांचे साथीदार टोपण नावे जाहीर करतात. पैशाचे व्यवहार किंवा लॅपटॉपमध्ये टोपण नावांनी नोंद केली जाते. पोलिसांनी अटक केलेला विंदू दारासिंग हा जॅक या टोपण नावाने सट्टा खेळत होता असा आरोप आहे. सट्टेबाजांकडून आता मोबाईल किंवा वेब ॲप्लिकेशनचा वापर केला जात आहे. ईमेलप्रमाणे सट्टेबाज आणि त्यांच्या साथीदारांना लॉग इन आयडी आणि पासवर्ड दिला जातो. आता नोंदवही ऐवजी लॅपटॉप आणि मोबाईलचा वापर होतो. हवालाची जागा बिटकॉइनने घेतली आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे परदेशात बसूनही मुंबईतील व्यक्तीकडून सट्टा लावता येत असल्यामुळे सट्टेबाजांना पकडणे पोलिसांना अवघड झाले आहे.