मुंबई - जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूची 10 हजार मुंबईकरांना लागण झाली ते त्यामधून बरेही झाले. मात्र, त्यांना कोरोना होऊन गेल्याची माहितीच नसल्याची धक्कादायक बाब थायरोकेयर लॅबने केलेल्या एका सर्वेक्षणातून समोर आल्याची माहिती मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. आरोक्या स्वामी वेलुमानी यांनी दिली. देशभरात 18 कोटी लोकांना कोरोना होऊन गेला असल्याची शक्यताही वेलुमानी यांनी वर्तवली आहे.
मुंबईत सध्या कोरोनाचे एक लाखाहून अधिक रुग्ण आहेत. मुंबईत कोरोनाचा प्रसार झाला आहे का याची माहिती मिळवण्यासाठी पालिकेने टाटा इस्टिट्यूट फंडामेंटल रिसर्च यांच्यासोबत काही भागात सेरो सर्वेक्षण करत 10 हजार नागरिकांच्या रक्ताचे नमुने घेण्याचे काम सुरू केले आहे. त्याचा अहवाल अजून येणे बाकी आहे. असे असताना थायरोकेअर या खासगी लॅबने सेरो सर्वेक्षण करून 10 हजार मुंबईकरांना कोरोनाची लागण झाली होती, ते त्यामधून चांगलेही झाले. मात्र, त्यांना त्याची माहिती पडली नाही, असे या सर्वेक्षणाच्या अहवालात म्हटले आहे.
थायरोकेअरने केलेल्या अँटीबॉडी चाचण्यांमध्ये वरळीत 32.15 टक्के, घाटकोपरला 36.7 टक्के, सांताक्रुजमध्ये 31.45 टक्के तर बांद्रा पश्चिमेला 17 टक्के मुंबईकरांना कोरोनाचा संसर्ग होऊन गेल्याची धक्कादायक बाबसमोर आली आहे. थायरोकेअर लॅबचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. वेलुमानी यांनी देशभरात 18 कोटी लोकांना कोरोना होऊन गेला असल्याची शक्यता वर्तवली आहे. थायरोकेयरने भारतातील सहाशे ठिकाणाहून 60 हजाराहून अधिक नमुने तपासले आहेत. यामधून 15 टक्के लोकांना कोरोनाची लागण होऊन गेलेली आहे. त्यातून ते आपोआप बरेही झाल्याचा निष्कर्ष काढला आहे.
आयसीएमआरच्या परवानगीनंतर सरकारी प्रयोगशाळा बरोबरच खासगी प्रयोगशाळांनी एका महिन्यात केलेल्या निरीक्षणातील हा अहवाल असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी थायरोकेअर लॅब रिपोर्टच्या आधारे पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना पत्र लिहून एक लाख लोकांची तपासणी करण्याची मागणी केली आहे.