महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ईटीव्ही भारत विशेष : गेल्या 6 वर्षांत मुंबईतून भीक मागणाऱ्या 1 हजार 39 मुलांची सुटका

आपल्या देशामध्ये १४ वर्षांखालील मुलांकडून काम करून घेणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र, तरीही सर्रास लहान मुलांना कामावर ठेवले जाते. अनेक ठिकाणी त्यांच्याकडून भीक मागून घेतली जाते. मुंबईमध्ये गेल्या सहा वर्षांमध्ये याबाबत काय कारवाई झाली, याबाबत ईटीव्ही भारतचा हा विशेष रिपोर्ट...

child
बालक

By

Published : Sep 29, 2020, 12:25 PM IST

मुंबई -देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात बालमजुरीच्या गुन्ह्यात गेल्या सहा वर्षांत (२०१३ ते २०१९) या दरम्यान 2 हजार 620 खटले नोंदवले गेले. रस्त्यावर भीक मागणाऱ्या 1 हजार 39 मुलांना सोडवण्यात आले आहे. मुंबईसारख्या शहरात ट्रॅफिक सिग्नलवर, लोकल ट्रेन, गजबजलेल्या बाजारात लहान मूल भीक मागताना आढळतात. लहान मुलांना भीक मागण्यासाठी जबरदस्ती केली जात असल्याचे काही प्रकरणांतून समोर आले. त्यामुळे मुंबई पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाई करत अनेक भीक मागणाऱ्या लहान मुलांची सुखरूप सुटका केली आहे.

मुंबईतून मागील सहा वर्षामध्ये भीक मागणाऱ्या 1हजार 39 मुलांची सुटका करण्यात आली आहे

मुंबईतील 'चाईल्ड वेलफेअर कमिटी'चे (सीडब्ल्यूसी) अध्यक्ष विजय डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार सीडब्ल्यूसीकडे दरवर्षी ४००पेक्षा अधिक लहान मुलांची प्रकरणं येतात. यामध्ये घर सोडून पळून आलेले, व्यसनाधीन मुले व पैशांसाठी भीक मागणाऱ्या मुलांचा समावेश आहे. या मुलांचे मानसिक व शैक्षणिक पुनर्वसन या ठिकाणी केले जाते. मुंबई पोलिसांकडून अशा प्रकरणात मोठी कामगिरी केली जात असल्याने मुंबईत लहान मुलांकडून बळजबरी भीक मागवून घेण्याचे प्रमाण सध्या काहीसे कमी झाले आहे. मात्र, अद्यापही इतर राज्यातून मुलांना बळजबरी आणून भीक मागवण्याचा धंदा केला जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. लहान मुलांकडून भीक मागवून घेण्याचे एखादे रॅकेट मुंबईत आहे का? हे अद्याप तरी मुंबई पोलिसांच्या कारवाईत उघड झाले नसल्याचे, डोईफोडे यांनी सांगितले.

गेल्या काही वर्षांत बालकामगार संदर्भात दाखल गुन्हे व भीक मागणाऱ्या मुलांना सोडवल्याची संख्या -

२०१३मध्ये बालमजुरीच्या गुन्ह्यात एकूण १७४ खटले दाखल झाले तर, भीक मागणार्‍या ७२ मुलांना सोडवण्यात आले.

२०१४मध्ये बालमजुरीच्या गुन्ह्यात एकूण ४४१ खटले दाखल झाले होते तर, भीक मागणार्‍या १२४ मुलांना मुलांना सोडवण्यात आले.

२०१५मध्ये बालमजुरीच्या गुन्ह्यात एकूण ७१८ खटले दाखल झाले होते तर, भीक मागणार्‍या ४५७ मुलांना सोडवण्यात आले.

२०१६मध्ये बालमजुरीच्या गुन्ह्यात एकूण ५३५ खटले दाखल झाले होते तर, भीक मागणाऱ्या १६५ मुलांना सोडवण्यात आले.

२०१७मध्ये बालमजुरीच्या गुन्ह्यात एकूण ४८६ खटले दाखल झाले होते तर, भीक मागणार्‍या १३८ मुलांना सोडवण्यात आले.

२०१८मध्ये बालमजुरीच्या गुन्ह्यात एकूण २२३ खटले दाखल झाले होते तर, भीक मागणार्‍या ३१ मुलांना सोडवण्यात आले.

मे २०१९पर्यंत बालमजुरीच्या गुन्ह्यात एकूण ४३ खटले दाखल झाले होते तर, भीक मागणार्‍या ३४ मुलांना सोडवण्यात आले.


काय म्हणतो कायदा -

देशात कुठल्याही ठिकाणी बालमजूर ठेवणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र, असे असतानाही बऱ्याच ठिकाणी खास करून गार्मेंट कंपन्या, जरिकाम कारखाने, हॉटेल्स व घरकामासाठी मोठ्या प्रमाणावर बालमजूर ठेवले जातात. भारतात 14 वर्षांखालील मुलांना बालमजूर म्हणून ठेवणे हे कायद्याने गुन्हा आहे. यासाठी कमीतकमी 6 महिने तर, जास्तीत जास्त 2 वर्षांच्या तुरुंगवासापासून 50 हजार रुपयांपर्यंत दंड आकाराला जाऊ शकतो.

ABOUT THE AUTHOR

...view details