मुंबई - चांदीवली येथे बेस्ट बसची वाट पाहत असणाऱ्या प्रवाशांवर बंद घराची संरक्षक भिंत कोसळली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे, तर २ जण जखमी असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
चांदीवलीत बेस्ट बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांवर संरक्षक भिंत कोसळली; १ ठार, २ जखमी
चांदीवलीत संरक्षक भिंत कोसळून एका प्रवाशाचा मृत्यू, तर २ जण जखमी झाले आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
चंद्रकांत मोनाप्पा शेट्टी (वय ४२ वर्ष) असे मृत प्रवाशाचे नाव आहे. चांदीवली येथील म्हाडा कॉलनी १ मध्ये काही स्थानिक प्रवाशी बेस्ट बसची वाट पाहत उभे होते. यावेळी बाजूच्या झाडाची फांदी घराच्या संरक्षक भिंतीवर कोसळली. त्यामुळे जीर्ण झालेली भिंत प्रवाशांच्या अंगावर कोसळली. माहिती मिळताच अग्मिशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ढिगाऱ्याखाली दबलेल्या २ प्रवाशांना बाहेर काढून खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. तसेच चंद्रकांत यांचा मृतदेह राजावाडी रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवलेला आहे.
भिंत कोसळलेल्या घरातील लोक काही दिवसांपूर्वीच दुसरीकडे राहायला गेले आहेत. हे बंद घर पाडण्याची जबाबदारी विकासकाची होती. मात्र, विकासकाने घर पाडले नसल्याने आज एकाचा मृत्यू झाला असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.