लातूर- सध्याच्या संचारबंदीत हातावर पोट असणाऱ्यांवर उपासमारीची वेळ येत आहे. युवासेनेच्यावतीने कुटुंबांसाठी मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. एका महिन्यापासून भाजीपाला, फळे आणि जीवनाश्यक अन्नधान्याच्या वस्तूंचे वाटप युवा सेनेचे पदाधिकारी करत आहेत. देहविक्री व्यवसाय करणाऱ्या महिलांना शनिवारी अन्न- धान्याचे वाटप करण्यात आले.
गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचा घरपोच पुरवठा; युवासेनेचा स्तुत्य उपक्रम
लॉकडाऊनचा कालावधी वाढत असल्याने मदत करणाऱ्या अनेक संस्थांनी हात आखडता घेतला. परंतु, युवा सेनेचा उपक्रम आजही कायम आहे.
लॉकडाऊनच्या सुरवातीला गोरगरिबांच्या मदतीसाठी अनेक संस्था, संघटना पुढे सरसावल्या होत्या. मात्र, लॉकडाऊनचा कालावधी वाढत असल्याने अनेकांनी आखडता हात घेतला. परंतु, युवा सेनेचा उपक्रम आजही कायम आहे. सुरवातीच्या काळात शेतकऱ्यांकडून भाजीपाला विकत घेऊन नागरिकांना त्याचे मोफत वाटप करण्यात आले होते. तर मध्यंतरी फळांचेही वाटप झाले होते.
सध्या रिक्षा चालक आणि समाजातील गरजवंताना अन्नधान्याचे वाटप केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून शनिवारी देहविक्री व्यवसायातील महिला कुटुंबियांना मदतीचे वाटप करण्यात आले आहे. ज्यांचे पोट हातावर आहे अशा घटकांचा शोध घेऊन मदत त्यांना घरापर्यंत पोचवण्याचे काम युवा सेनेचे पदाधिकारी करीत आहेत. जोपर्यंत संचारबंदी लागू आहे तोपर्यंत हे काम असेच सुरू राहणार असल्याचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. सुरेश दामरे यांनी सांगितले. अन्नधान्याचे वाटप करताना जिल्हाप्रमुख अॅड. राहुल मातोळकर, उपजिल्हाप्रमुख अॅड. रवी पिचारे यांची उपस्थिती होती.