लातूर - विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. उदगीर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. अनिल कांबळे यांच्या प्रचारार्थ उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. या सभेला लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, बिदरचे खासदार भगवंत खुब्बा, खासदार सुधाकर शृंगारे यांच्यासह अनेक नेते मंचावर उपस्थित होते.
राहुल गांधींची उपस्थिती म्हणजे उमेदवाराचे डिपॉझिट जप्त
राहुल गांधी जिथे जातात तेथील काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होते. महात्मा गांधींनी देश स्वतंत्र झाल्यानंतर काँग्रेस विसर्जित करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, तो सल्ला नेहरूंनी ऐकला नाही. त्यामुळे त्यांचे काम आता राहुल गांधी करत आहेत. कारण जिथे जिथे राहुल गांधी प्रचाराला जातात तेथे काँग्रेसची अनामत जप्त होते, असा टोला आदित्यनाथ यांनी लगावला आहे. तसेच भाजप म्हणजे संविधान बदलू पाहणारा पक्ष असा अपप्रचार करणाऱ्या काँग्रेस पक्षानेच सर्वात जास्त संविधानाचा अपमान केलाय, असा आरोप योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.