लातूर -'अनलॉक'मध्ये सर्व बाजारपेठ सुरू झाली आहे. एवढेच नाही तर जिम आणि आयपीएलसारखे सामनेही आयोजित केले जात आहेत. मात्र, ज्या ठिकाणी कुस्तीगीर सराव करतात त्या तालीम अजूनही बंद आहेत. परिणामी सहा महिन्यांपासून ही अवस्था असल्याने पैलवानांवर उपासमारीची वेळ आली आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी सराव करणारे पैलवान आता थेट शेतामध्ये काम करीत आहेत. त्यामुळे तालीम सुरू करण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्व कुस्तीगीर जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना भेटले आहेत.
लातूर जिल्ह्याला कुस्तीची मोठी परंपरा आहे. हरिश्चंद्र बिराजदार, काका पवार यांच्या तालमीत अनेकांनी सराव करून राज्यस्तरीय स्पर्धा जिंकलेल्या आहेत. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून तालीमच बंद असल्याने सराव करावा कुठे हा प्रश्न आहे. शिवाय कुस्ती स्पर्धाही बंद असल्याने त्यांच्या खुराकाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तालीम सुरू असल्यास ज्या पैलवानाला दत्तक घेण्यात आले आहे, त्यांचा सराव आणि खुराक हे दोन्हीही सुरू असते. पण, सध्या तालीम बंद असल्याने या पैलवानांनी थेट गाव गाठले आहे. काळाच्या ओघात बाजारपेठा, वेगवेगळ्या स्पर्धा, जिम ह्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता तालीमही सुरू करण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्व पैलवानांनी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांची भेट घेतली आहे. दोन दिवसात तालीम सुरू करणार असल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले आहे.