लातूर - मागील काही वर्षापासून पोट दुखीने त्रस्त झालेल्या ६५ वर्षीय जेष्ठ महिलेने रुग्णालय गाठले. डॉक्टरांनी तपासण्या केल्या तेव्हा त्यांना त्या महिलेच्या पोटाच तब्बल १२ किलो वजनाचा मांसाचा गोळा (ओव्हेरियन ट्युमर) असल्याचे दिसून आले. डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा निर्णय घेत सुमारे दीड तास अथक प्रयत्न करुन तो गोळा बाहेर काढला. गोळा काढल्यानंतर रुग्ण महिलेने सुटकेचा निःश्वास टाकला.
ताहेरबी युनूस शेख असे त्या रुग्णाचे नाव असून त्या उस्मानाबाद येथील रहिवाशी आहेत. "एमआयएमएसआर' वैद्यकीय महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयातील स्त्रीरोग विभागातील डॉक्टरांनी ताहेरबी यांच्या पोटातील तब्बल १२ किलो वजनी मांसाचा गोळा शस्त्रक्रिया करुन बाहेर काढला.
ताहेरबी शेख यांना गेल्या अनेक वर्षापासून पोटदुखीचा त्रास होत होता. ग्रामीण रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. क्रांती केंद्रे-सिरसाट यांनी ताहेरबी शेख यांची प्राथमिक तपासणी केली असता त्यांच्या पोटात मासाचा गोळा (ओव्हेरियन ट्युमर) असल्याचे अढळून आले. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करुन त्यांच्या पोटाची सोनोग्राफी, सिटीस्कॅन यासह आवश्यक त्या तपासण्या केल्या.