लातूर -लातूर आणि पाणीटंचाई हे समीकरण गेल्या अनेक वर्षांपासून चालत आले आहे. मात्र यावर्षी पाऊस चांगला झाल्याने, शहराला पाणीपुरवठा करणारे मांजरा धरण 100 टक्के भरले आहे. परंतू असे असतानाही लातूरकरांचे पाण्यासाठी होणारे हाल अद्याप थांबलेले नाहीत. शहराला 8 दिवसांतून एकदाच पाणीपुरवठा होताे. तसेच शासकीय कॉलनीत तर पाणीच मिळत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करावे अशी मागणी नागरिक करत आहेत.
लातूर शहरासह येथील एमआयडीसीला देखील मांजरा धारणातूनच पाणीपुरवठा केला जातो. शिवाय मांजरा नदीकाठच्या परिसरात केवळ ऊसाची शेती केली जाते. मात्र, गेल्या चार वर्षांपासून समाधानकारक पाऊस नसल्याने केवळ पिण्याच्या पाण्याचे नियोजण व्हावे, या दृष्टीने जिल्हा प्रशासन प्रयत्न करत होते. यंदा तर पावसाळ्याच्या तोंडावर धरणात केवळ 16 दलघमीच पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे 12 दिवसातून एकदा पाणीपुरवठा केला जात होता.
चार वर्षांनंतर पुन्हा मांजरा धरण पूर्णक्षमतेने भरले आहे. एवढेच नाही तर अधिकचा पाणीसाठा झाल्याने धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले होते. मात्र तरी देखील लातूरकरांना 8 दिवसातून एकदाच पाणी मिळत आहे. किमान दोन दिवसांतून एकदा पाणीपुरवठा करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. आठ दिवसानतंर एक दिवस सहा तास पाणी सोडण्यापेक्षा, दर दोन दिवसांनी एक तास पाणी सोडावे अशी मागणी करण्यात येत आहे. मात्र, प्रत्येकवेळी तांत्रिक बिघाड असल्याचे कारण नागरिकांना देण्यात येते. त्यामुळे धरणात पाणी असून देखील पाण्यासाठी नागरिकांचे हाल सुरू आहेत.
योग्य नियोजनाची आवश्यकता
भर उन्हाळ्यात लातूर महानगरपालिकेने योग्य नियोजन केल्यामुळेच 15 दिवसातून का होईना सुरळीत पाणीपुरवठा होत होता. आता धरण पूर्ण क्षमतेने भरले असताना योग्य नियोजन होणे आवश्यक आहे. मध्यंतरी विद्युत पंपामध्ये बिघाड झाल्याने अनियमित पाणीपुरवठा होत होता. आता निसर्गाच्या कृपादृष्टीने धरणात पाणी असले तरी पाण्याचे योग्य नियोजन होणे आवश्यक आहे. पाणी आठ- आठ तास सुरू असल्याने पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होतो.
पाणी साठवण्यासाठी नागरिकांची तारेवरची कसरत