लातूर -देशात सध्या कोरोनाचे संकट घोंगावत आहे. लातूरकरांना मात्र, दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. पाणीटंचाई जणू काही पाचवीलाच पुजली असल्यासारखी अवस्था जिल्ह्यातील ग्रामीण भागात आहे. शहराला 10 दिवसातून एकदा पाणीपुरवठा होत असून गावांची अवस्था मात्र, भीषण आहे. शहरापासून अवघ्या 13 किमी अंतरावर असलेल्या ममदापुरला महिन्यातून एकदा, अनिश्चित अशा प्रकारे पाणीपुरवठा केला जात आहे. सबंध गावासाठी एकच कूपनलिका(हातपंप) असून अनेकांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.
ममदापुर लातूर-नांदेड मार्गावरील अडीच हजार लोकसंख्या असलेले गाव आहे. शहरापासून अवघ्या 13 किमी आणि मुख्यमार्गावर गाव असल्याने गावात सर्व सोई- सुविधा आहेत. मात्र, पाण्यासाठी बाराही महिने हे गाव तहानलेलेच असते. पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत पंपाचा घोटाळा, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष यामुळे पूर्वजांनी उभारलेली कूपनलिकाच गावकऱ्यांची तहान भागवत आहे.