महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अहमदपुरात पाणीप्रश्न पेटला : नगरपालिकेसमोर मडक्याचा चुराडा अन् मुख्याधिकाऱ्यांना बांगड्यांचा आहेर

पाण्यासाठी होत असलेले नागरिकांचे हाल आणि नगरपरिषदेची पाणी पुरवठ्याबाबतची उदासीनता याचे पडसाद आज अहमदपुरात पाहवयास मिळाले.

लातूर

By

Published : May 27, 2019, 8:20 PM IST

लातूर- पाण्यासाठी होत असलेले नागरिकांचे हाल आणि नगरपरिषदेची पाणी पुरवठ्याबाबतची उदासीनता याचे पडसाद आज अहमदपुरात पाहवयास मिळाले. तब्बल महिन्यातून एकदा आणि तो ही अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने घागर मोर्चा काढण्यात आला. नगरपरिषदेसमोर येताच नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला. घागर आणि मटक्यांचा चुराडा पालिका दालनाच्या समोरच करून महिलांनी बांगड्या मुख्याधिकारी रामकृष्ण जाधव यांच्या अंगावर फेकल्या. त्यामुळे रखरखत्या उन्हात अहमदपुरात पाणीप्रश्न पेटला असल्याचे दिसून आले.

अहमदपूर
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या लिंबोटी धरणात पाणीसाठा असतानाही केवळ प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांची गेल्या 4 महिन्यांपासून भटकंती होत आहे. यामुळेच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा घागर मोर्चा काढण्यात आला. शहरातील विविध प्रभागातील पाणीटंचाई पाहून हा मोर्चा नगरपरिषदेवर धडकला. यावेळी महिला डोक्यावर पाण्याचा हंडा आणि हातामध्ये बांगड्या घेऊन दाखल झाल्या होत्या.

येथील नागरिकांनी विद्यमान आमदार विनायक पाटील यांना भरभरून मते दिली असतानाही मूलभूत सोयी-सुविधांकडे दुर्लक्ष केले जात आहे. अपक्ष म्हणून त्यांना नागरिकांनी झुकते माप दिले असताना आता भाजप पक्षश्रेष्ठींची मनधरणी करण्यामुळे नागरिकांच्या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप, यावेळी बाबासाहेब पाटील यांनी केला. लिंबोटी धरण जवळ असतानाही केवळ पाईपलाईनचे काम पूर्ण न झाल्याने नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शिवाय विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. नागरिकांच्या प्रश्नावर पालिका प्रशासनाकडे उत्तर न येताच मोर्चेकऱ्यांनी थेट मटके आणि घागरी पालिकेच्या दालनासमोर टाकण्यास सुरुवात केली. महिलांनी मुख्यधिकारी यांच्या दिशेने बांगड्या भिरकावल्या. यावेळी बाबासाहेब पाटील यांनी प्रशासनाशी संवाद साधून पाणीपुरवठ्याबाबत आश्वासन मिळाल्यानंतर मोर्चा मागे घेतला.

शिवाय या पाईपलाईनचे काम सुरू असून शक्य तेवढ्या लवकर आणि सुरळीत पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे मुखधिकारी रामकृष्ण जाधव यांनी सांगितले.

आचारसंहिता संपताच मोर्चे-आंदोलनाला सुरुवात

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सोमवारपासून शिथिल झाली आहे. त्यामुळे विरोधकांनी दुष्काळाचा मुद्दा हाती घेत आंदोलने, मोर्चे काढण्यास सुरुवात केली. सोमवारी अहमदपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने घागर मोर्चा काढण्यात आला तर दुसरीकडे निलंगा येथे काँग्रेसच्या वतीने शेतकऱ्यांना घेऊन रुमने मोर्चा काढण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details