लातूर -रेणापूर तालुक्यातील खरोळा हे १५ ते १८ हजार लोकवस्ती असलेले गाव. या गावामध्ये राहणाऱ्या एका निराधार वयोवृद्ध व्यक्तीचा वाढदिवस गावकऱ्यांनी मिळून साजरा केला आहे. रक्ताचे नाते नसतानाही गावकऱ्यांनी त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षात गावात जंगी कार्यक्रम घेऊन 75 वा वाढदिवस साजरा केला आहे. मोहन मामा कदम (वय ७५) असे या वयोवृद्ध व्यक्तीचे नाव आहे. गावात सगळे त्यांना 'मोहन मामा' नावाने हाक मारतात.
खरोळा गावात राहणारे मोहन काका हे पत्नीच्या मृत्यूनंतर एकटे पडले. त्यांची दोन्ही मुले ही कामानिमित्त पुण्या-मुंबईला असतात. मात्र, मामाने कधी गावची वेस ओलांडली नाही. काळाच्या ओघात त्यांच्या जुन्या घराची पडझड झाली आणि दुसरीकडे लग्नानंतर मुलांनी गावाकडे ढुंकूनही पाहिले नाही. अशा परस्थितीत मामांनी गावातच राहण्याचा निर्धार कायम ठेवला.
गावातील प्रत्येकाच्या खुशालतेची चौकशी मोहन मामा करीत असत. हाच लळा कायम राहिल्याने संबंध गावाने त्यांची जबाबदारी घेतली. संबंध गावाने त्यांचा ७५ वा वाढदिवस ढोल-ताशाचा गजर आणि जेवणावळी उठवून साजरा केला. तसेच, त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षी त्यांना निवारा करून देण्याचा निर्धार एस.आर ग्रुपने केला आहे. गावातील हजारो ग्रामस्थांची केवळ उपस्थितीच नाही तर, प्रत्येकाने मोहन मामाला भरपोषाख आहेर केला होता. गावकऱ्यांचे प्रेम पाहून मोहन मामा देखील भारावून गेले होते.