लातूर - सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाकडून अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. मात्र, नागरिक जिल्हा प्रशासनाच्या प्रत्येक उपाययोजनेवर पाणी फिरवताना दिसतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लातूरमधील सर्व भाजीमंडई आणि बाजार बंद करण्यात आले होते. मात्र, भाजी विक्रेत्यांनी थेट रस्त्यावरच भाजीपाला विक्रीला सुरुवात केली आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंचे तीन तेरा वाजले असून अत्यावश्यक सेवा देणाऱया वाहनांनाही अडथळा निर्माण होत आहे.
जिल्हा प्रशासनाचे निर्बंध अन् भाजी विक्रेत्यांची शक्कल; रस्त्यावरच लावला भाजीपाला बाजार - लातूर कोरोना अपडेट
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लातूरमधील सर्व भाजीमंडई आणि बाजार बंद करण्यात आले होते. मात्र, भाजी विक्रेत्यांनी थेट रस्त्यावरच भाजीपाला विक्रीला सुरुवात केली आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंचे तीन तेरा वाजले असून अत्यावश्यक सेवा देणाऱया वाहनांनाही अडथळा निर्माण होत आहे.
यापूर्वी भाजीमंडईच्या ठिकाणी गर्दी होत आहे हे निदर्शनास आल्यानंतर ईदगा मैदानात भाजीमंडई सुरू करण्यात आली होती. मात्र, नियमांची अंमलबजावणी होत नसल्याने शहरात 4 ठिकाणी सुरू असलेल्या भाजीमंडई बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यानंतर गुळमार्केट या मुख्य बाजारपेठेत केवळ सौदे करून भाजीपाला गल्ली-बोळात जाऊन विक्री करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, सौद्याच्या ठिकाणीच भाजीपाला स्वस्त मिळतो, या आशेने नागरिकांनी या ठिकाणीच गर्दी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे येथील मुख्य बाजारपेठ देखील बंद करण्यात आली.
यावर पर्याय म्हणून विक्रेत्यांनी थेट रस्त्यावर भाजीपाला विक्री सुरू केली आहे. सुदैवाने अद्याप लातूर शहरात कोरोनाचा शिरकाव झालेला नाही मात्र, उदगीरमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे, याचा विचार नागरिकांनी करणे गरजेचे आहे. विक्रेत्यांनी रस्त्यावरच भाजीमंडई थाटल्याने आता काय कारवाई केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.