लातूर- जिल्ह्यात आतापर्यंत 59 संशयितांची कोरोना तपासणी करण्यात आली असून जिल्ह्यात एकही रुग्ण आढळून आलेला नाही. तरीही जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. अत्यावश्यक सेवेच्या ठिकाणी 'सोशल डिस्टन्स'च्या नियमांचे पालन केले जात आहे. येथील ईदगाह मैदानात भाजीमंडई हलविण्यात आली असून प्रत्येक विक्रेत्यांमध्ये ५ फुटापर्यंतचे अंतर ठेवण्यात आले आहे. शिवाय सकाळी १० ते दुपारी २ पर्यंतच भाजीमंडई सुरू ठेवण्याची परवानगी जिल्हा प्रधासनाने दिली आहे.
आता कुठे लातूरकरांकडून नियमांचे पालन होताना पाहवयास मिळत आहे. शहरातील रस्ते निर्मनुष्य असले तरी सकाळी आणि सायंकाळी अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होत होती. त्यामुळेच जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी गर्दीच्या ठिकाणांसाठी पर्यायी व्यवस्था करून दिली आहे. रस्त्यावरील फळगाडे थेट बसस्थानकात हलविण्यात आले आहेत तर किराणा दुकानदारांना सोशल डिस्टन्स ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याचे पालन होताना पहावयास मिळत आहे. दुसरीकडे पाण्याच्या टाकीजवळील भाजीमंडईत होत असलेली गर्दी टाळण्यासाठी ही भाजीमंडई दयानंद महाविद्यालयात हलविण्यात आली होती. मात्र, अपुरी जागा आणि होणारी गर्दी यामुळे गेल्या दोन दिवसांपासून भाजीमंडई लगतच्या ईदगाह मैदानात सुरू आहे. प्रत्येक भाजी विक्रेत्यांमध्ये 5 फुटाचे अंतर ठेवायला सांगितले आहेत. यावर लक्ष ठेवण्यासाठी पालिकेचे कर्मचारी याठिकाणी तळ ठोकून आहेत. त्यामुळे संचारबंदीच्या नियमांचे पालन आता पालन करत आहेत.