लातूर- विजबिलात सवलत नाही यावरून राज्यसरकारवर विरोधकांकडून सडकून टीका होत आहे. ऊर्जामंत्री यांनी वीजबिलात सवलत देण्याचे आश्वासन दिले होते परंतु, त्याची अंमलबजावणी होत नसल्याने वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी यांनी महावितरणच्या मुख्य कार्यालयात चड्डी- बनियन घालूनच प्रवेश केला. विविध मागण्यांचे निवेदन मुख्य अभियंता यांना देण्यात आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊमुळे नागरिकांचे उद्योग-व्यवसाय ठप्प आहेत. शिवाय अनेकांच्या नौकाऱ्यांवर देखील गंडांतर आले आहे. असे असताना महावितरण कंपनीने अवाजवी वीजबिल ग्राहकांच्या माथी मारले आहे. त्यामुळे वीजबिल भरण्यात सूट तर मिळावीच शिवाय 50 वीजबिल माफ करण्याची मागणी करण्यात आली आहे. कोरोणाच्या काळात सरकारने सर्वसामान्य जनतेला मदतीचा हात देणे अपेक्षित होते. परंतु नागरिकांना शॉक देण्याचे काम हे सरकार करीत आहे. दिवाळीपूर्वी ऊर्जामंत्री यांनी वीजबिलात सवलत देण्याचे आश्वासन दिले होते पण त्याची पूर्तता करण्यात आलेली नाही.त्यामुळे सक्तीची वसुली थांबविण्यात यावी, विद्युत पुरवठा कायम ठेवावा, शिवाय लॉकडाऊनच्या काळातील वीज बिल माफ करावे अन्यथा 10 डिसेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा वंचितचे जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे यांनी दिला आहे.