लातूर - जे जे नवं ते लातूरला हवं.... अगदी त्याप्रमाणेच निलंगा तालुक्यातील आनंदवाडी येथील ग्रामस्थांनी प्रेरणादायी निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायत निवडणूक ही बिनविरोध तर केलीच आहे. परंतु, सर्व जागांवर महिलांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आरक्षण कोणासाठीही सुटले, तरी सरपंच पदाची धुरा देखील महिलाच सांभाळणार हे स्पष्ट झाले आहे.
आनंदवाडीचा निवडणूक पॅटर्न : ग्रामपंचायतीमध्ये 'महिलाराज' जिल्ह्यात 408 ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या आहेत. यातच सरपंच पदाचे आरक्षण हे निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर जाहीर होणार आहे. त्यामुळे पॅनल प्रमुखांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. मात्र, आनंदवाडी येथे ग्रामस्थांनी एकत्र येत सर्व जागांवर महिलांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. कारभारात तत्परता आणि विकास कामाबाबत महिलांची इच्छा यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा -सोलापूर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 12 हजार जण रिंगणात
महिला सरपंच झाल्यापासून गावाचा विकास
गावातील मतदारांची संख्या 442 एवढी तर संपूर्ण अर्थकारण हे शेतीवर अवलंबून आहे. 15 वर्षांपूर्वी सरपंच पदाचे आरक्षण महिलेला सुटले आणि तेव्हापासून गावानेही विकासाची कास धरली. याच दरम्यान गाव हागणदारीमुक्त झाले, गावात बंदिस्त नाल्या, पक्के रस्ते, उद्यान आणि व्यायामशाळा उभारण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे गावात कोणी हुंडा देत नाही किंवा घेत नाहीत. देहदानाचा संकल्प करणारी आनंदवाडी अशी या गावाची ओळख झाली आहे. एक ना अनेक उपक्रम या गावाने राबविले आहेत. याला सुरवात महिला सरपंच झाल्यापासून झाली असल्याने यंदा तर सर्वच जागांवर महिलांना संधी देण्यात आली आहे.
महिलांच्या हाती विकासाची दोर
एकीकडे महिलांचे सदस्यत्व केवळ नावालाच असते...आणि पतीच सर्व कारभार पाहत असतात, अशी स्थिती अनेक ठिकाणी पाहायला मिळते. पण आनंदवाडीत चित्र उलटे आहे. केवळ आरक्षण म्हणून महिलांना उभे केले जात नाही तर, सर्वच जागांवर महिलांना प्राधान्य देऊन गावचा विकास कसा करायचा आणि गावच्या हिताचे निर्णय काय घ्यायचे, याचे सर्व स्वतंत्र महिलांना आहे. त्यामुळेच आनंदवाडीतील ग्रामस्थ हे आनंदी असतात हे नक्की.
ज्येष्ठांचे मार्गदर्शन, गट-तटाच्या राजकारणाला थाराच नाही
गावच्या हितासाठी ज्येष्ठ नागरिक जे निर्णय घेतात, त्याचे तंतोतंत पालन केले जाते. विकास कामावरून राजकारण होते पण गावच्या एकीला धक्का पोहचेल असा एकही निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे गावात वेगवेगळे गट-तट असे अस्तित्वातच नाहीत.
हेही वाचा -सांगली : 3 हजार 76 उमेदवार ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रिंगणात