महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गुरुजनांच्या नशिबी 'कायम अमावस्या'च; विनाअनुदानित शिक्षक करतात मोलमजुरी - विनाअनुदानित शिक्षकांवर आली दारोदार भटकण्याची वेळ

गुरुविना कोण दाखवील वाट असे म्हटले जाते आणि याच वाटेचा अवलंब करुन अनेकांनी यशाची शिखरे गाठली आहेत. पण विनाअनुदानित शिक्षकांची कहाणी वेगळीच आहे. आतापर्यंत नोकरी करुन एकही पैसा न मिळालेले शिक्षक हे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पडेल ते काम करत आहेत. शाळेत ज्ञानार्जनाचे काम आटोपल्यानंतर अनेक शिक्षक हे मजुरी, रिक्षाचालक, आचारी, भटजी यासारखी कामे करत आहेत.

latur
शाळा सुटल्यावर भटजीचे काम करणारे शिक्षक

By

Published : Jul 7, 2020, 9:38 PM IST

लातूर- ज्यांच्यामुळे जीवन घडले अशा गुरूंबद्दल गुरुपौर्णिमेला शुभेच्छाचा वर्षाव झाला आहे. सोशल मीडिया असो, की प्रत्यक्ष भेटून गुरूंबद्दल गुरुपौर्णिमेला कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. मात्र, याच गुरूंच्या नशिबी आतापर्यंत ती पौर्णिमा आलेलीच नाही. गेल्या 18 वर्षांपासून केवळ अमावस्याच या विनाअनुदानित शिक्षकांच्या नशिबाला आलेली आहे. नोकरीला 18 वर्ष झाली, पण पगार म्हणून एक नवा पैसाही पदरी पडला नसलेल्या शिक्षकांची कहाणी 'ईटीव्ही भारत'ने उलगडण्याचा प्रयत्न केला आहे.

असे म्हटले जाते, गुरुविना कोण दाखवील वाट आणि याच वाटेचा अवलंब करुन अनेकांनी यशाची शिखरे गाठली आहेत. पण विनाअनुदानित शिक्षकांची कहाणी वेगळीच आहे. आतापर्यंत नोकरी करुन एकही पैसा न मिळालेले शिक्षक हे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पडेल ते काम करत आहेत. शाळेत ज्ञानार्जनाचे काम आटोपल्यानंतर अनेक शिक्षक हे मजुरी, रिक्षाचालक, आचारी, भटजी यासारखी कामे करत आहेत. या शिक्षकांनी धडे दिलेले विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहेत. परंतु शिक्षकांच्या पदरी निराशा कायम आहे. 18 वर्षाच्या कालावधीत या शिक्षकांनी तब्बल 280 वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलने, मोर्चे काढले आहेत. त्यामुळे 'कायम' एवढा एकच शब्द हटवण्यात आला असून सध्या विनाअनुदानित शिक्षक अशी राज्यातील 22 हजार शिक्षकांची ओळख आहे.

गुरुजनांच्या नशिबी 'कायम' अमावस्याच; विनाअनुदानित शिक्षक करतात मोलमजुरी

शिक्षकावर पूजा-पाठ करण्याची ओढावली वेळ

युती सरकारच्या काळात अनेक संस्था या राष्ट्रवादी- काँग्रेसच्या असल्याने याकडे दुर्लक्ष करण्यात आले. पण यामध्ये शिक्षकांचा काय दोष. तर आता महाविकास आघाडीच्या सरकारने 6 महिने अवधी घेतला होता. तर सध्या कोरोनाचे सावट या शिक्षकांच्या पगारीच्या निर्णयातील अडसर ठरत आहे. सरकारच्या उदासीनतेमुळे औसा तालुक्यातील सेलू येथील नितीन शेलुकर यांच्यावर पूजा-पाठ करण्याची नामुष्की ओढावली आहे. शाळा संपताच हे काम गेल्या 10 वर्षांपासून करत आहेत. त्यालाही आता कोरोनाचे ग्रहण लागले आहे.

शाळा सुटल्यावर 'प्राध्यापक' राबतात शेतात

रेणापूर तालुक्यातील खरोळा येथे प्राध्यापक असलेले गंगाधर पाचेगावकर हे शाळा आटोपून शेतात राबतात आणि गावातीलच विद्यार्थ्यांचे क्लास घेतात. तर संदीपान गोरे हे शेतात राबत असून निसर्गाच्या लहरीपणामुळे हा व्यवसायही करणे मुश्किल होत आहे. एकंदरीत शिक्षकी पेशा हा प्रतिष्ठेचा समजला जातो. मात्र, त्याची दुसरी बाजू अशी असून या परिस्थितीमुळे अनेकांचे संसार मोडले आहेत. सरकारच्या दरबारी या शिक्षकांच्या मागण्या आहेत. आगामी कॅबिनेट बैठकीत यावर निर्णय होईल, असा आशावाद राज्याध्यक्ष विनाअनुदान कृती समितीचे प्रा. मारूती सूर्यवंशी यांना आहे. मात्र, यावेळी जर तोडगा निघाला नाही, तर या गुरुजनांच्या नशीबात पौर्णिमेऐवजी अमावस्याच कायम राहणार हे नक्की....

ABOUT THE AUTHOR

...view details