लातूर- अपेक्षेप्रमाणे विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा येथील राजकीय नेत्यांना उजनीच्या पाण्याची आठवण झाली आहे. लातूरकरांना पाणी मिळो अथवा न मिळो मात्र, २० वर्षापसून गाजत असलेल्या काल्पनिक विषयाचा फायदा राजकीय नेत्यांनी सोईस्कररित्या घेतला आहे. सध्या जिल्ह्यातील पाण्याबाबतची स्थिती प्रतिकूल नसली तरी राजकीय नेत्यांसाठी हा मुद्दा अनुकूल आहे. त्यामुळेच आता उजनीच्या पाण्यावरून पुन्हा राजकारण सुरू झाले आहे.
हेही वाचा - मुख्यमंत्र्यांच्या भेटीचे राजकरण नको - इंदोरीकर महाराज
पावसाळा संपत आला तरी लातुरात सरासरीच्या तुलनेत केवळ ५१ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे मोठे धरणे आणि प्रकल्प तर सोडाच गावालगतच्या नद्या- ओढ्यानाही पाणी नाही. पावसाळ्यात ५६ टँकरने पाणीपुरवठा केला जात असून शंभरहून अधिक जलस्रोतांचे अधिग्रहण करण्यात आले आहे. ही भीषण स्थिती निर्माण झाली असून पुन्हा लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागणार, अशी सध्याची अवस्था आहे. एवढेच नाही तर जिल्हा प्रशासन त्या तयारीला लागले आहे. त्यामुळेच निवडणुकांच्या तोंडावर सर्वसामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न येथील राजकीय नेत्यांनी प्रचाराचा मुख्य अजेंड्यावर घेतला आहे.