निलंगा (लातूर) – तु मुंबईवरून आला आहेस गावात का फिरतोस, याचा राग मनात धरून एकाने शेजारी गावातील नातेवाईकांना बोलावून मध्यरात्रीच्या सुमारास झोपलेल्या दोघांवर चाकूने वार हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर २जण जखमी आहेत, ही घटना निलंगा तालुक्यातील बोळेगाव येथे घडली आहे. या प्रकरणी कासार शिरसी पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शहाजीराव किशनराव पाटील व वैभव बालाजी पाटील अशी मृतांची नावे आहेत.
शनिवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास विद्यवान तात्याराव बरमदे (मु.भिवंडी) आणि त्याच्या शेजारच्या गावातील पाच नातेवाईकांनी शहाजीराव व वैभव यांना झोपल्या ठिकाणी चाकूने वार करून जागीच ठार केले. या घटनेत श्रीधर चंदर पाटील आणि सागर शाहजी पाटील हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मृत व जखमी सर्वजण बोळेगाव येथील आहेत. जखमींवर उमरगा येथील रुग्णालयात उपचार चालू आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.