लातूर- सध्या कोरोनाने देशभरात थैमान घातले आहे. वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्य विभागाचे वेगवेगळे पराक्रम समोर येत आहेत. लातुरात घडलेला प्रकार अधोरेखित करण्यासारखा आहे. लातुरात अहवाल प्रलंबित असलेल्या व्यक्तींना घरी सोडण्यात आले. मात्र, त्यानंतर त्या व्यक्तींचे अहवाल पाॅझिटिव्ह आढळ्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे संबंंधित व्यक्ती घरी जाऊन अनेक जणांच्या संपर्कात आल्या असून आता त्या सर्व जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ममदापूर येथील 11 जणांना आरोग्य विभागाने तपासणीसाठी विलगिकरण कक्षात दाखल केले होते. मात्र, यापैकी 9 जणांचे अहवाल हे निगेटिव्ह आले तर दोघांचे अहवाल हे प्रलंबित होते. प्रलंबित अहवाल दुसऱ्या दिवशी येतात. मात्र, याला फारसे गांभीर्याने घेतले नसल्याचा प्रकार लातुरातील 12 नंबर पाटी येथील विलगिकरण कक्षात घडला आहे. या दोन रुग्णांनाही निगेटिव्ह अहवाल आलेल्या व्यक्तींबरोबर घरी सोडण्यात आले. परिणामी या दोन व्यक्तींच्या संपर्कात गावातील अनेकजण आले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाचे काम वाढले असून या दोघांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची आता कोरोना चाचणी करण्यात आली आहे.