लातूर- येथील शासकीय सर्वोपचार रुग्णालयातील ११ नंबर वार्डमध्ये उपचार सुरू असलेल्या दोन रुग्णांचा अचानक मृत्यू झाला. तर, इतर चौंघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अचानक झालेल्या या प्रकारामुळे ही घटना नेमकी कशामुळे झाली याबाबत तर्क-वितर्क मांडले जाऊ लागले आहेत.
शासकीय रुग्णालयात एकाच दिवशी दोन रुग्णांचा अचानक मृत्यू हेही वाचा -सिद्धिविनायकाच्या घुमटाला सोन्याची झळाळी
येथील शासकीय सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी रतनबाई मारुती गायकवाड (वय ६ कोष्टगाव ता. रेणापूर) या उपचारासाठी दाखल झाल्या होत्या. तर, १८ जानेवारीला वर्षा नरसिंग गायकवाड या लातूर येथील ३४ वर्षीय महिला याच ११ नंबरच्या वार्डमध्ये उपचार घेत होत्या. मात्र, रविवारी अचानक या दोन्ही रुग्णांसह इतर चौघेजण अत्यवस्थ झाले होते. अचानक झालेल्या या घटनेत रतनबाई गायकवाड आणि वर्षा गायकवाड यांचा मृत्यू झाला आहे. तर, इतर चौंघावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या दोघींनाही गंभीर असे आजार होते. उपचारादरम्यान त्यांना इंजेक्शन देण्यात आले आणि त्यानंतर त्यांना थंडी वाजून आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यवस्थित खुलासा केला नाही. तर, मृत रुग्णांच्या नातेवाईकांनीही काही बोलण्यास नकार दिला आहे.
त्यामुळे शवविच्छेदन अहवाल समोर आल्यावरच या घटनेमागचे कारण समोर येणार आहे. वैद्यकीय अधिकारी खेडकर यांनी दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. परंतु, नेमके कारण काय आहे? हे स्पष्ट केले नाही. शवविच्छेदनाचा अहवाल येईपर्यंत काहीच सांगता येणार नसल्याचेही ते म्हणाले आहेत. दरम्यान, उपचारादरम्यानच काहीतरी गडबड झाली असल्याची चर्चा दबक्या अवाजात सुरू आहे.