लातूर -विहिरीतील मोटार पंप वर काढत असताना विहिरीत पडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी सकाळी आलमला गावात ही घटना घडली. शरण गुरुनाथ बिराजदार (26) आणि गुरुनाथ बिराजदार (28) अशी मृतांची नावे आहेत. एकाच घरातील दोघांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
विहिरीत बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू, गावावर शोककळा
विहिरीतील मोटार पंप वर काढत असताना विहिरीत पडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी सकाळी आलमला गावात ही घटना घडली. शरण गुरुनाथ बिराजदार (26) आणि गुरुनाथ बिराजदार (28) अशी मृतांची नावे आहेत. एकाच घरातील दोघांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सध्या रब्बी हंगामातील पिके जोमात आहेत. विहिरीतील विद्युत मोटार बाहेर काढून नदीवर टाकायची होती. याकरता शरण गुरुनाथ बिराजदार आणि राहुल गुरुनाथ बिराजदार हे दोघे बुधवारी सकाळी शेतामध्ये गेले होते. दोर लावून मोटार बाहेर काढण्याचा प्रयत्न दोघे भाऊ करत होते. यादरम्यान राहुलचा पाय घसरला आणि तो विहिरीत पडला. मोठा भाऊ विहिरीत पडल्याचे पाहून शरण याने कोणताही विचार न करता विहिरीत उडी घेऊन भावाचा प्राण वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र, त्यालाही पोहता येत नव्हते. विहिरीवरील आरडाओरड ऐकूण शेतामध्ये असलेलेल्या सालगड्याने देखील विहिरीत उडी घेतली. पण हे दोघेही त्याला आत ओढू लागल्याने, त्याने कसातरी आपला जीव वाचवला. विहिरीच्या बाहेर येऊन त्याने आरओरड केली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. परिसरातील लोकांनी या दोघांना विहिरीतून बाहेर काढल्यानंतर रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. राहूलचा काही वर्षांपूर्वीच विवाह झाला होता. एकाच घरातील दोघे गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.