लातूर - शहरात गेल्या महिन्याभरापासून लागू करण्यात आलेला लॉकडाऊन आता 13 ऑगस्टपासून शिथिल केला जात आहे. मात्र, तरीही कोरोनावर मात करण्यासाठी 17 ऑगस्टपर्यंत ट्रेस, टेस्ट आणि ट्रीट अशा त्रिसूत्रीचा अवलंब केला जात आहे. यामध्ये 1 लाख अँटीजेन टेस्ट करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने समोर ठेवले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली.
लॉकडाऊन उठवण्यापूर्वी लातुरात 'या' त्रिसूत्रांचा अवलंब जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता 15 जुलैला लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. 31 जुलैपासून नगरपरिषद आणि नगरपालिका या ठिकाणी नियम शिथील करण्यात आले. मात्र, शहरातील वाढती संख्या पाहता 15 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला. आता 15 ऑगस्टनंतर शहरातील बाजारपेठही नियमित सुरू राहणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली. दरम्यान, 13 ऑगस्टपासून 17 ऑगस्टपर्यंत 1 लाख अँटीजेन टेस्ट करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने समोर ठेवले आहे. त्याअनुषंगाने व्यापारी, किराणा दुकानदार, कर्मचारी यांच्या टेस्ट करण्यास सुरुवात झाली आहे.
लातूर शहरात 7 केंद्र उभारण्यात आले आहेत. शिवाय जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या नागरिकांचाही टेस्ट केली जाणार आहे. तसचे शहरात व्यापारी, उद्योजक तसेच शासकिय अधिकारी, कर्मचारी यांच्या तपासणीला सुरुवात झाली आहे. याकरिता खासगी लॅबचेही सहकार्य घेतले जाणार आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी कॅम्पचे आयोजन केले जात आहे. जास्तीत जास्त टेस्ट करण्याचे जिल्हा प्रशासनचे उद्दिष्ट आहे.
हेही वाचा -महापालिका आयुक्तांच्या सुरक्षेसाठी खासगी बाऊन्सर; पालिकेच्या सुरक्षा रक्षकांवर भरोसा नाही का? विरोधकांचा सवाल
जिल्ह्यात दिवसाकाठी 200 ते 230 रुग्णांची भर गेल्या 4 दिवसांपासून पडत आहे. मात्र, अँटीजेन टेस्ट वाढविल्यामुळे अधिक रुग्ण समोर येत असल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले आहे. संपूर्ण बाजारपेठ खुली करण्यापूर्वी कोरोनाबाधित रुग्ण समोर यावेत आणि त्यांच्यावर उपचार सुरू व्हावेत यानुषंगाने हा उपक्रम राबविला जात आहे. एका रुग्णामागे संपर्कात आलेल्या 20 जणांची टेस्ट केली जात आहे. जिल्हा प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी महिन्याभराच्या लॉकडाऊनमध्ये रुग्णांचा चढता आलेख हा कायम राहिलेला आहे. त्यामुळे आता अँटीजन टेस्ट मधून काय निष्पन्न होणार हे देखील पाहावे लागणार आहे. सध्या जिल्ह्यात 1 हजार 577 रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर आतापर्यंत 144 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.