लातूर - उदगीरमध्ये एका वृद्ध महिलेचा कोरोनाने मृत्यू झाल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेतली जात आहे. रविवारपासून तीन दिवस शहरात कर्फ्यु लागू करण्यात आला असून पहिल्या दिवशी शहरातील रस्ते निर्मनुष्य होते.
Corona Virus : उदगीरमध्ये तीन दिवसांचा कर्फ्यू; पहिल्या दिवशी शहरात कडकडीत बंद, रस्ते निर्मनुष्य - लॉकडाऊन
लातूरमधील उदगीरमध्ये दोन दिवसापूर्वी एका वृद्ध महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर काही तासातच तिचा मृत्यू झाल्याने प्रशासनाने सतर्क होत तीन दिवसांची संचारबंदी लागू केली. रविवारी संचारबंदीच्या पहिल्या दिवशी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला तसेच रस्तेही ओस पडल्याचे दिसून आले.
शनिवारी उदगीर शहरातील एका वयोवृद्ध महिलेचा अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह आला होता आणि अवघ्या काही तासांमध्येच तिचा मृत्यूही झाला. कोरोनासह मधुमेह तसेच इतर आजारही या महिलेला होते. मात्र, भविष्यातील धोका टाळण्यासाठी शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. विशेषतः मृत महिलेच्या घरापासून 3 किलोमीटर पर्यंतच्या परिसरावर पोलीस यंत्रणेचे लक्ष राहणार आहे. तसेच बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्यावर थेट गुन्हे दाखल केले जाणार आहेत.
महिलेच्या संपर्कात आलेल्या 26 जणांचे नमुने घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. यापैकी तिघांचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. या महिलेने कुठेही प्रवास केला नव्हता. त्यामुळे कोरोनाची लागण झाली कशी याचा शोध सुरू आहे.