निलंगा(लातूर)- जिल्ह्यात अवकाळी पाससाचा कहर चालूच असून निलंगा तालुक्यातील कल्याणी माळेगाव येथील किशोर ढवीले या शेतकऱ्याच्या शेतात झाडाखाली बांधलेल्या तीन म्हशी अंगावर वीज पडल्याने जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.
निलंगा तालुक्यात कल्याणी माळेगाव येथे वीज पडून तीन म्हशी जागीच ठार बुधवारी दुपारी ४ वाजता अचानक जोराचा वारा वादळ आणि अवकाळी पाऊस झाला आणि शेतकऱ्यांच्या फळबागांबरोबर पशुधनाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात बांधावर गोठ्यात बांधलेली जनावरे, शेती उपयोगी अवजारे, जनावरांचा चारा याचे नुकसान या अवकाळी पावसामुळे होत आहे .
कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेला ग्रामीण भागातील शेतकरी जीवन मरणाच्या उंबरठ्यावर जीवन जगत आहे. रोजच्या खाण्या पिण्याच्या वांद्यात जीवन जगत असलेला शेतकरी कसे बसे दूध विकून आपले जीवन जगत आहे .परंतु,या अचानक होत असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे.
शेतकऱ्याची जनावरे वीज पडून दगावल्यानंतर मिळणारी शासनाची आर्थिक मदत ही तुटपुंजी असल्यामुळे लाखो रूपयांचे नुकसान भरून निघत नाही. त्यात वाढ करावी अन्यथा सरकारने नैसर्गिक आपत्तीने दगावलेल्या जनावरांचा मोबदला न देता बाजारातून सरळ खरेदी करून जनावरे शेतकऱ्यांना द्यावीत, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. शासकीय अधिकारी तोंड बघून पंचनामा करतात आणि तुटपुंजी मदत मिळेल असा पंचनामा करतात, अशी तक्रार शेतकरी करत आहेत.