लातूर -राज्यात यंदा सर्वत्र समाधानकारक पाऊस होत असला तरी लातूर जिल्ह्यावर मात्र, पावसाची अवकृपा कायम आहे. रिमझिम पावसामुळे खरिपातील पिके बहरत आहेत. परंतु या रिमझिम पावसामुळे पाणी प्रकल्पांचा पाणीसाठा वाढण्यास मदत होत नाही. पावसाळा सुरू होऊन तीन महिने होत आले तरी अद्याप जिल्ह्यातील एकही लघु-मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला नाही. त्यामुळे लातूरात पाण्याचे संकट कायम राहण्याची शक्यता आहे.
लातूरात पाणीटंचाईचे सावट कायम; जिल्ह्यातील पाणी प्रकल्प अद्याप कोरडेठाक
पावसाळा सुरू होऊन तीन महिने होत आले तरी अद्याप जिल्ह्यातील एकही लघु-मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला नाही. त्यामुळे लातूरात पाण्याचे संकट कायम राहण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील पावसाची वार्षिक सरासरी ही 781 मिलीमीटर एवढी आहे. त्या तुलनेत अद्याप 450 मिलीमीटर पाऊस झाला आहे. बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावल्याने गेल्या वर्षभरापासून मृत पाणीसाठ्यात असलेले मांजरा धरणातील पाणीसाठा काही प्रमाणात वाढला आहे. सध्या मांजरा धरणात 3 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यामुळे लातूर शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काहीअंशी मार्गी लागला आहे. मात्र, जिल्ह्यातील 8 मध्यम प्रकल्पांपैकी दोन प्रकल्प हे कोरडेठाक आहेत तर इतर प्रकल्पांमध्येही पुरेसा पाणीसाठा नाही.
औसा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उटी तावरजा धरणाची पाणी साठवण क्षमता ही 27.710 दलघमी एवढी आहे. ऑगस्टचा शेवटचा आठवडा उजाडला तरी अद्याप हा प्रकल्प कोरडाठाक आहे. त्यामुळे नोव्हेंबरपासूनच टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार, अशी स्थिती निर्माण झाली आहे. रेणा, व्हटी, उदगीर तालुक्यातील निरु, देवर्जन, साकोळ, घरणी या प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा आहे. सध्याच्या रिमझिम पावसामुळे खरिपातील सोयाबीन, उडीद, मूग, तूर ही पिके बहरत असली तरी, पाणीसाठा वाढेल, असा पाऊस जिल्ह्यात झालेला नाही. भविष्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी अजूनही लातूरकरांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.