लातूर- कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबरोबरच कमी होत असलेला ऑक्सिजनचा पुरवठा ही जिल्हा प्रशासनाच्या चिंतेत भर टाकणारी बाब आहे. दिवसाकाठी दोनशे ते अडीचशे कोरोना रुग्ण वाढत आहे. जिल्ह्यात दोन हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे दिवसाकाठी 1 हजार 600 ऑक्सिजन सिलेंडरची आवश्यकता असताना केवळ 600 सिलेंडरचा पुरवठा होत आहे. परिणामी रुग्णांच्या नातेवाईकांची ऑक्सिजनच्या शोधात दमछाक होत आहे. तर खासगी रुग्णालये आता उपचारापेक्षा रुग्ण दुसरीकडे पाठविण्यावर भर देत आहेत.
कोरोनाग्रस्तावर उपचारासाठी ऑक्सिजन महत्वाचा आहे. त्या अनुशंगाने जिल्ह्यात दोन एजन्सीजकडून ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा केला जात आहे. यासाठी आवश्यक असलेले लिक्वीड हे पुणे आणि नागपूरहून आणले जाते. मात्र, असे असतानाही केवळ 800 सिलिंडर एवढाच ऑक्सिजन निर्माण होत आहे. यापैकी 20 टक्के ऑक्सिजन इतरत्र वापरला जात आहे तर 80 टक्के हा आरोग्य सेवेसाठी त्याचा वापर होत आहे. कोरोनाग्रस्तांना ऑक्सिजनची गरज निर्माण झाल्यापासून ऑक्सिजन लिक्वीडच्या मागणीत दुप्पटीने वाढ करण्यात आल्याचे विजया एजन्सीचे वैभव गिल्डा यांनी सांगितले आहे. सध्या जिल्ह्यात दोन हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. वैद्यकीय महाविद्यालयासह लातूर शहरातील 14 खासगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत. मात्र, ऑक्सिजन सिलेंडरचा वेळेत पुरवठा होत नसल्याने उपचारापूर्वीच रुग्णाची स्थिती पाहून त्यांना सोलापूर किंवा पुण्याकडे पाठविले जात आहे.