लातूर - ज्या खरीपावर शेतकऱ्यांचे वर्षभराचे गणित अवलंबून असते ते गणितच पावसाच्या लहरीपणामुळे बिघडले आहे. अद्यापपर्यंत सरासरी एवढी पेरणीही झाली नसताना दुसरीकडे मोडणीला सुरुवात झाली आहे. सोमवारी लातूर तालुक्यतीलच बाभळगाव आणि भिसे चिंचोली गावच्या शेतकऱ्यांनी सोयाबीन या प्रमुख पिकांवर नांगर फिरवला. एवढेच नाही तर काढणी केलेले पीक थेट जनावरांच्या दावणीला टाकले. ही अवस्था आहे लातूर जिल्ह्यातील खरीप हंगामाची.
खरिपाची पेरणी अन् महिन्यातच मोडणी; जिल्ह्यात एक महिन्याचाच हंगाम - पेरणी
लातूरमध्ये खरीप हंगामाची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. एकीकडे सरासरी एवढी पेरणी झाली नसताना दुसरीकडे मोडणीला सुरुवात झाली आहे. सोमवारी लातूर तालुक्यतीलच बाभळगाव आणि भिसे चिंचोली गावच्या शेतकऱ्यांनी सोयाबीन या प्रमुख पिकांवर नांगर फिरवला. एवढेच नाही तर काढणी केलेले पीक थेट जनावरांच्या दावणीला टाकले.
पावसाळ्याला दोन महिने उलटले तरी लातूरकरांना चिंता आहे ती पिण्याच्या पाण्याची आणि जनावरांच्या चाऱ्याची. हजारो रुपये खर्ची करून शेतकऱ्यांनी पावसाच्या भरवशावर पेरणी केली. आतापर्यंत एकूण सरासरीच्या ६५ टक्के क्षेत्रावर पेरा झाला असून उर्वरित ३५ टक्केवरील शेतकऱ्यांना अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे. उलटार्थी पेरणी केलेले शेतकरी आता दुहेरी संकटात सापडल्याचे दिसत आहे.
पेरणीसाठी पैशाचा अपव्यय आणि आता मोडणीसाठीही त्यांना खर्च करावा लागत आहे. पिकाची वाढच होत नसल्याने बाभळगाव येथील तुकाराम थडकर यांनी आपल्या १२ एकरवरील उभ्या पिकात कोळपणी केली तर भिसे चिंचली येथील सत्तार पटेल यांनी १० एक्करवरील सोयाबीनवर ट्रॅक्टर फिरवला आहे. आता पाऊस झाला तरी पिकापेक्षा तण अधिक होईल, यामुळे शेतकरी चिंतातूर आहे. त्यामुळे खरिपातून उत्पादन तर सोडाच शेतकऱ्यांना पदरमोड करून बियाणे जमिनीत गाढावे लागले होते आणि आता काढावेही लागत आहे. त्यामुळे आता पाऊस झाला तरी खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या पदरी पडेल की नाही याबाबत शंकाच आहे.