लातूर - अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथे ग्रामीण रुग्णालय निर्माण करावे यासाठी मागील अनेक दिवसांपासून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. त्याचा प्रस्तावही लातूरच्या जिल्हा परिषदेने राज्य शासनाकडे पाठविला आहे. मात्र, तो अजुनही शासनाकडे प्रलंबित आहे. त्यामुळे किनगाव व परिसरातील रुग्णांना सामान्य आजारासाठीही खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत असल्याने नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
माहिती देताना जिल्हा आरोग्य अधिकारी किनगाव हे लातूर, बीड, परभणी या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेले असून बाजारपेठेचे मोठे गाव आहे. येथे विविध शैक्षणिक संस्था, शासकीय, निमशासकीय कार्यालय, पशुवैद्यकीय दवाखाना, विविध बँका, डाक कार्यालय, ग्रामपंचायत, पोलीस ठाणे आदी कार्यालये आहेत.
किनगांवच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज 200-300 बाह्यरुग्ण उपचार घेतात. प्रत्येक बुधवारी किनगांव येथे आठवडी बाजार भरतो. त्यामुळे परिसरातील खेड्यांमधून नागरिक आठवडी बाजाराला मोठ्या संख्येने गर्दी करतात. त्यामुळे या महत्वाच्या शहरात हक्काचे ग्रामीण रुग्णालय तात्काळ उपलब्ध व्हावे, यासाठी नागरिक मागणी करत आहेत.
किनगांवच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रुपांतर व्हावे यासाठी प्रशासनाने शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. त्यामध्ये शासनाने सध्यस्थितीचा स्पष्ट अभिप्राय लातूरच्या आरोग्य प्रशासनाला मागितला असून तालूका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांना पाठवले आहेत. त्यांच्याकडून आलेला प्रस्ताव पुन्हा शासनाला पुढील प्रक्रियेसाठी पाठवला जाणार आहे. कोणतीही संस्था निर्मिती हा राज्य पातळीवरचा निर्णय असतो. त्यामुळे त्यासंदर्भातील आदेश निघून मंजुरी मिळेल, अशी आशा असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हणमंत वडगावे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले आहे.
किनगांव येथे ग्रामीण रुग्णालय व्हावे, अशी जिल्ह्याच्या आरोग्य विभागाचीही अपेक्षा आहे. तसा प्रस्ताव शासनाला पाठवला होता. पण, त्यात काही स्पष्टीकरण शासनाने मागितले आहे. त्याची पुर्तता जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग करत आहे. आगामी काळात शासनाच्या वतीने आरोग्य संस्थेचा बृहत आराखडा तयार होणार आहे. त्यामध्ये किनगांवला ग्रामीण रुग्णालय होइल, अशी आशा आहे. परंतु, त्यासाठी आगामी वर्षभराचा कालावधी लागेल, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख यांनी 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीशी दुरध्वनीवरुन बोलताना सांगितले आहे.
हेही वाचा -Latur Doctor Online Fraud : लातूरात उच्च शिक्षित डॉक्टरला 'ऑनलाइन फ्रॉडचा' झटका; तीन लाख लंपास