महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिव्यांग विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात : सुविधांचा अभाव अन् प्रशासनाचे दुर्लक्ष - लातूर दिव्यांग विद्यार्थी शिक्षण सुविधा

ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा गाजावाजा होत आहे. आतापर्यंत यातील त्रुटीही अनेक वेळा समोर आल्या. तरी देखील ही पद्धत स्वीकारली जात असून आता विद्यार्थी याचा अवलंब करत आहेत. मात्र, अंध विद्यार्थी शिक्षणापासून वंचितच आहेत. ना ऑफलाईनचे धडे ना ऑनलाईनसाठीची प्रणाली यामुळे हे विद्यार्थी शिक्षणापासून दूर आहेत. त्यांचे शिक्षक प्रयत्न करत असले तरी त्यांना मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Specially Abled
दिव्यांग व्यक्ती

By

Published : Dec 17, 2020, 10:54 AM IST

लातूर - कोरोनामुळे ओढवलेल्या परिस्थितीचा सर्वाधिक परिणाम शिक्षण क्षेत्रावर झाला. मार्च महिन्यापासून शाळा बंद करण्यात आल्या होत्या. यावर उपाय म्हणून ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय समोर आला. मात्र, तो काही घटकांपूरताच मर्यादित राहिला. सध्या इंग्लिश स्कूल आणि क्लासेस यामध्ये ऑनलाइन शिक्षणाचे धडे दिले जात असले, तरी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कोणतेही धोरण ना सरकारने ठरवले ना शालेय विभागाने. यासाठी आवश्यक असणाऱ्या साधन सामुग्रीचा पुरवठा करण्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे अंध विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित आहेत.

सुविधांअभावी दिव्यांग विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारातच आहे

शिक्षकाने दाखल केली याचिका -

लातूर येथील शिवाजी विद्यामंदिर या संस्थेत 16 अंध विद्यार्थ्यांचा प्रवेश आहे. मात्र, गेल्या 8 महिन्यांपासून विद्यार्थी शाळेत आले नाहीत. त्यांच्या शिक्षणासाठी काय धोरण असावे, हे अद्याप ठरवलेले नाही. अंध विद्यार्थी हे पुस्तकातील अक्षरांना स्पर्श करून शिक्षणाचे धडे घेतात. आता शाळा बंद झाल्याने ते या प्रवाहापासून दूर गेले आहेत. विशेषतः शिवाजी विद्यामंदिरात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी हे ग्रामीण भागातील आणि परजिल्ह्यातील आहेत. त्यांच्यासाठी आवश्यक असलेल्या साधनांचा पुरवठाच अद्यापपर्यंत करण्यात आलेला नाही. या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या अनुषंगाने विचार व्हावा यासाठी येथील शिक्षक सुभाष चिने यांनी याचिकाही दाखल केली आहे. अद्यापपर्यंत त्यांचीही दखल घेतलेली नाही.

साधनांचा अभाव -

अंध विद्यार्थी हे ग्रामीण भागातील असून त्यांच्या घरची परिस्थिती हालाखीची आहे. त्यामुळे प्रत्येकाकडे स्मार्ट फोन असेलच असे नाही. शिवाय असला तरी त्याचा वापर कसा करावा, याचे प्रशिक्षण त्यांना देण्यात आलेले नाही. सध्या शिक्षक काही विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर लेखी किंवा ऑडिओ, अशा प्रकारचा अभ्यास देतात व विद्यार्थी त्याचे पठण करतात. मात्र, हे शिक्षण प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचलेले नाहीत. दिव्यांगांना त्यांच्या मागणीप्रमाणे साहित्याचा पुरवठा करणे अपेक्षित होते. परंतु, याबाबत कोणतेच धोरण सरकारने राबवले नाही. त्यामुळे अंध विद्यार्थी हे शिक्षणापासून दूर जात आहेत. माध्यमिक विभागाने इयत्ता 9 आणि 10 वीचे वर्ग घेण्यास परवानगी दिली आहे. मात्र, लातूरच्या शिवाजी विद्यामंदिर येथे एकही अंध विद्यार्थी अद्याप आलेला नाही. उलट येथील शिक्षकच जमेल त्या पद्धतीने विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम देत आहेत. यातून अपेक्षित शिक्षण पूर्ण होत नसल्याची खंत शिक्षक व्यक्त करत आहेत.

सोशल मीडियाच्या माध्यमातून शिक्षकांचा प्रयत्न -

तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे मिळावेत ही सरकारची भूमिका असली तरी प्रत्यक्षात तसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. समाजकल्याण विभागाकडून दिव्यांगांना साहित्याचे वाटप होणे क्रमप्राप्त होते. मात्र, यात दिरंगाई करण्यात आली. शिवाय प्रत्येकाला मागणीनुसार साहित्य मिळालेले नाही. त्यामुळे आता शिक्षकचं विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मोबाईवर सोशल मीडियाचा आधार घेत अभ्यास देत आहेत. मग तो लिखित स्वरूपाचा असेल किंवा ऑडिओ स्वरूपाचा. प्रत्यक्ष विद्यार्थी उपस्थित राहू दिले जाणारे शिक्षण आणि ऑनलाइन पद्धतीचे शिक्षण यामध्ये मोठी तफावत आहे. कारण अंध विद्यार्थ्यांचे शिक्षण हे त्यांच्या हाताच्या स्पर्शवरून अधिक होत असते.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details