लातूर- उदगीरमध्ये गेल्या दोन दिवसात कोरोनामुक्त झालेल्या 11 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते. त्यामुळे उदगीर शहर कोरोनामुक्त होणार याबाबत जिल्हा प्रशासन आशादायी होते. मात्र, शनिवारी अचानक 10 रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने उदगीरकरांसह प्रशासनाची चिंता वाढली आहे.
उदगीरमध्ये आढळले 10 नवे कोरोनाबाधित रुग्ण; वाढत्या रुग्णसंख्येने प्रशासनाच्या चिंतेत भर - कोरोना अपडेट लातूर
लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शनिवारी शहरात १० नव्या बाधितांची नोंद करण्यात आली आहे.
जिल्ह्यात एकट्या उदगीर शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. शहरात आतापर्यंत 41 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी एका 70 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. तर 21 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या सामान्य रुग्णालयात 19 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
शनिवारी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उदगीर शहरातून 17 नमुने तपासणीसाठी आले होते. पैकी 10 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे उदगीरकारांच्या आणि जिल्हा प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. 29 मे पर्यंत उदगीर शहरात संचारबंदी वाढविण्यात आली आहे. उदगीर शहर वगळता इतरत्र एकही रुग्ण नसला तरी शहरातील ही वाढती आकडेवारी चिंतेची बाब आहे.