महाराष्ट्र

maharashtra

कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट; जिल्ह्यातील 11 कोविड सेंटर तात्पुरते बंद

By

Published : Oct 27, 2020, 6:46 PM IST

लातूर जिल्ह्यात दोन महिन्यांपूर्वी दिवसाकाठी लातूर जिल्ह्यात 450 ते 500 कोरोना रुग्ण आढळून येत होते. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून यामध्ये मोठ्या प्रमाणात घट होताना पाहायला मिळत आहे.

latur
लातूर

लातूर - दोन महिन्यांपूर्वी दिवसाकाठी लातूर जिल्ह्यात 450 ते 500 कोरोना रुग्ण आढळून येत होते. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून यामध्ये मोठ्या प्रमाणात घट होताना पाहायला मिळत आहे. सोमवारी सर्वात कमी म्हणजे केवळ 39 रुग्ण जिल्ह्यात आढळून आले आहेत. शिवाय कोविड सेंटरही रिकामे होऊ लागले आहेत. त्यामुळे 11 कोविड सेंटर हे तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आले आहेत.

जी. श्रीकांत - जिल्हाधिकारी, लातूर

जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती -

लातूर जिल्ह्यात सोमवारपर्यंत 19 हजार 960 कोरोना रुग्ण आढळून आले होते. पैकी 18 हजार 463 रुग्णांवर उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 909 जणांवर खासगी आणि शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून बाधित रुग्णांपेक्षा उपचाराने बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. ग्रामीण भागात तर प्रमाण हे नगण्य झाले असून, केवळ लातूर शहर, औसा, निलंगा, उदगीर शहरात थोड्याबहुत प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत.

11 कोविड सेंटर तात्पुरत्या स्वरुपात बंद

त्यामुळे जिल्हा प्रशासनावरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने 11 कोविड सेंटर हे बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी घेतला आहे. तात्पुरत्या स्वरूपात ही केंद्र बंद राहतील, उद्या गरज पडली तर खुली करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. मात्र, सध्या उदगीर, जळकोट, देवणी, औसा, निलंगा रेणापूर तालुक्यातील बावची, अहमदपूर तालुक्यातील मरशिवणी, लातूर शहरातील बिडवे इंजिनिअरिंग कॉलेज, शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन तसेच पुरणमल लाहोटी मुलींचे वसतिगृह ही सेंटर बंद करण्यात आली आहेत.

सोमवारी सर्वात कमी केवळ 39 नव्या रुग्णांची वाढ

सोमवारी सर्वात कमी म्हणजे केवळ 39 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी पूर्णपणे टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details