लातूर -शिक्षणाच्या दृष्टीने मराठवाड्यात लातूरचे वेगळे असे महत्व आहे. जिल्ह्यासह बीड, उस्मानाबाद, नांदेड या शहरांसह पराज्यातूनही विद्यार्थी मोठ्या संख्येने दाखल होतात. मात्र, कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून क्लासेस बंद असून ज्याप्रमाणे इयत्ता 9 आणि 10 वीच्या शाळांना परवानगी मिळाली आहे, त्याचप्रमाणे क्लासेसला देखील मिळावी अशी मागणी आता क्लासेस धारक करत आहेत.
मराठवाड्यातच नव्हे तर महाराष्ट्रात 'लातूर पॅटर्न'चे वेगळे असे महत्व आहे. शहरात जवळपास 300 हून अधिक क्लासेस आणि 25 हजारहून अधिक विद्यार्थी अशी स्थिती दरवर्षी असते. मात्र, कोरोनामुळे शहरात गेल्या वर्षभरापासून विद्यार्थ्यांचा शुकशुकाट होता तर क्लासेस बंद होते. लहान- मोठ्या क्लासेसधारकांचे मोठे नुकसान झाले आहे. 23 नोव्हेंबरला इयत्ता 9 आणि 10 चे वर्ग सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे क्लासेसला देखील परवानगी देण्याची मागणी क्लासेस चालकांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. त्यामुळे अडचणीत असलेल्या क्लासेस चालकांना शिक्षण विभाग आणि प्रशासन कसा मदतीचा हात देणार हे पाहावे लागणार आहे.