लातूर- आंतरजिल्हा बदली झाल्यावर वरिष्ठ अधिकारी एलपीसी देत नसल्यामुळे व पाच महिन्याचा पगार शासन काढत नसल्याच्या तणावामुळे धनेगाव (ता. देवणी) येथील शिक्षकाचा मृत्यू झाला आहे. नामदेव बोयणे असे मृत शिक्षकाचे नाव आहे.
मृत शिक्षक नामदेव बोयणे यांचे मित्र आणि पत्नीची प्रतिक्रिया बोयणे यांच्या पत्नीवर मागील 4 महिन्यापासून वैद्यकीय उपचार सुरू होते. यासाठी 10 ते 12 लाखांचा खर्च लागला होता. अशातच लातूरला बदली होऊन 4 महिने झाले, तरीही त्यांचा हक्काचा पगार त्यांना देण्यात आला नव्हता. या पगारा बाबत लातूर व परभणी दोन्ही जिल्हा परिषदांनी दाखवलेली अक्षम्य उदासीनता आणि प्रशासकीय चूक त्यांच्या बळीला कारणीभूत ठरल्याचा आरोप मृत बोयाने यांच्या मित्र शिक्षकाने केला आहे. तर वरिष्ठ अधिकारी यांच्या त्रासाला कंटाळून शिक्षक नामदेव बोयणे यांचा मृत्यू झाला असल्याची तक्रार पत्नी शशिकला बोयणे यांनी केली आहे.
बोयाणे हे 2018 पासून तणावात होते. लातूरला आंतरजिल्हा बदली होऊनही, लातूर जिल्हा परिषदमध्ये त्यांचे समायोजन प्रशासनाने होऊ दिले नाही. त्यासाठी त्यांना 2018 ची दिवाळी उपोषणात घालावी लागली. त्याच बरोबर यावर्षी सुद्धा मे 2019 च्या उन्हाळ्या मध्ये उपोषण करावे लागले. दरम्यान त्यांची लातूर जिल्हा परिषदेकडे बदली झाली. बोयाणे यांना तसेच त्यांच्या सोबत रुजू झालेल्या इतर मित्रांना जाणीव पूर्वक गैरसोयीच्या शाळा देण्यात आल्या.
हेही वाचा -काँग्रेस-राष्ट्रवादी चोर तर भाजपा हा संघटित डाकू- प्रकाश आंबेडकर
हे सर्व सहन करूनही संबंधित शिक्षकाला मागील चार महिन्यापासून नियमित पगार देण्यात आलेला नव्हता. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांची परभणी जिल्ह्यातील एलपीसी (अखेरच्या महिन्यातील पगार विवरण पत्र). सदरील एलपीसी तत्काळ मिळवून घेण्याची पूर्ण जबाबदारी लातूर जिल्हा परिषद प्रशासनाची होती. मात्र, मागील चार महिन्या पासून याबाबत लातूर जिल्हा परिषदेने परभणी जिल्हा परिषदेकडे एकदाही विचारणा किंवा पत्रव्यवहार केलेला नाही.
मागील तीन महिन्यापासून दिवंगत नामदेव बोयणे हे परभणी जिल्हा परिषद तसेच पाथरी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांचेकडे खेटे मारत होते. पण प्रशासन त्यांना न्याय देत नव्हते. 7 जुलै 2017 च्या ग्रामविकास कडील पत्रानुसार परभणी जिप ने एलपीसी देणे बंधनकारक होते. पण तसे झाले नाही व याबाबत लातूर जिल्हा परिषदने ही प्रयत्न केले नाहीत. वारंवार प्रयत्न करूनही न्याय मिळत नसल्याच्या तणावातून त्यांचा मृत्यू झाला. ही बाब दोन्ही जिल्हा परिषद प्रशासनाच्या कामाची पद्धत अधोरेखित करणारी आहे.
हेही वाचा -'आम्ही काय केले ते जनतेला माहितीये, तुम्ही काय दिवे लावले ते सांगा'
ही व्यथा केवळ मृत नामदेव बोयणे यांचीच नाही, तर लातूरला आंतरजिल्हा बदली झालेल्या प्रत्येक शिक्षकाची आहे. लातूर जिल्हा प्रशासन शिक्षकांना त्रास देण्याचे काम अव्याहतपणे करतच आहे. हे कधी थांबणार याचा जाब आज प्रत्येक बदलिग्रस्त शिक्षक विचारत आहे.