लातूर :निलंगा तालुक्यातील मौजे केळगावचा तलाठी भीमराव निलप्पा चव्हाण यास एका वृद्ध शेतकऱ्याकडून तीन हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले असून त्याच्यावर निलंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
3 हजार रुपये लाचेची मागणी :एक 67 वर्षीय वृद्ध शेतकरी तसेच त्याच्या पुतण्याची निलंगा तालुक्यातील मौजे राठोडा येथे 80 आर कुळाची जमीन आहे. त्या जमिनीच्या अनुषंगाने बक्षीस पत्राच्या आधारे विरोधी पार्टीने फेरफार नोंदविण्यासाठी तलाठी भीमराव चव्हाण यांच्याकडे अर्ज केलेला होता. यातील वृद्ध शेतकरी, त्यांचा पुतण्या यांनी सदर अर्जास आक्षेप नोंदविण्याची तलाठ्याकडे तक्रार केली होती. परंतु त्या वृद्ध शेतकऱ्याच्या तक्रारीला तलाठी कार्यालयात ऑनलाइन नोंदवून घेण्यासाठी तलाठ्यांनी पैसे मागितले होते. वृद्ध शेतकऱ्याच्या बाजूने अंतिम निर्णय देण्याच्या कामात मदत करण्यासाठी म्हणून तलाठी भिमराव चव्हाण यांनी त्या वृद्ध शेतकऱ्यास पंचासमक्ष सुरुवातीस 6 हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 3 हजार रुपये लाचेची मागणी केली होती.