लातूर - उदगीर तालुक्यातील हंगरगा येथे चार महिन्यापूर्वी विवाह झालेल्या एका नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. सासरच्या मंडळींनी फळामध्ये विषारी द्रव घालून मुलीची हत्या केल्याचा आरोप मृत विवाहितेच्या वडिलांनी केला आहे.
उदगीर तालुक्यातील हंगरगा येथील मेहंदी गोविंद जाधव हिचा गावातीलच प्रशांत अंधारे याच्यासोबत एप्रिल महिन्यात झाला होता. लग्नानंतर काही दिवसातच प्रशांत हा कामावर गेला. त्यानंतर मेहंदी हीचा सासू-सासरे, नणंद, दिर यांनी शारिरिक आणि मानसिक छळ करण्यास सुरुवात केला होता. तसेच, मेहंदी ही राखी पौर्णिमेसाठी माहेरी आली असता तिच्या भावाने तिला गिफ्ट दिले होते. हे गिफ्ट कोणी दिले यावरून मेहंदी आणि सासरच्या मंडळीत टोकाचे भांडण झाले होते. हा सर्व प्रकार मेहंदीने फोन करून सांगितला होता, असे मृत विवाहितेच्या वडिलांनी सांगितले.
उदगीर तालुक्यातील हंगरगा गावात नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू... हेही वाचा -कुत्र्या-मांजरांना कळते आत्महत्या करू नये, मग माणसांना का कळत नाही: सयाजी शिंदे
हाच राग मनात धरत सफरचंदमध्ये विषारी द्रव घालून मेहंदी हिला खाण्यास दिले, असे मेहंदीच्या वडिलांनी म्हटले आहे. भांडणाचा फोन आल्यानंतर गावातच असलेले वडील मेहंदीकडे आले. गंभीर अवस्थेत असलेल्या मुलीला उपचारासाठी गोविंद यांनी तिला उदगीर ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, मेहंदी हिचा मृत्यू झाला आहे. शिवाय सासरच्या मंडळींना मेहंदी च्या नवऱ्याचीही साथ असल्याचा आरोप गोविंद जाधव यांनी केला आहे.
गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू होती. गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मेहंदी हिचे आई-वडील उदगीर ग्रामीण ठाण्यात ठाण मांडून बसले होते. मात्र, लग्नानंतर अवघ्या चारच महिन्यात पोटाच्या मुलीचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने आई-वडिलांनी पोलीस ठाण्यासमोरच टाहो फोडला होता.